लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी/मुंबई : नायलॉनच्या मांजावर महाराष्ट्रात बंदी असतानाही त्याचा पतंग उडविताना सर्रास वापर केला जात आहे. रविवारी या नायलॉनच्या मांजाने शहरातील कल्याण नाका येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जाणाऱ्या दुचाकीचालकाचा बळी घेतला आहे.
संजय कबीर हजारे (वय ४७, रा. उल्हासनगर) असे मृताचे नाव आहे. संजय हजारे उड्डाणपुलावरुन जात असताना नायलॉनच्या मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला. जखमी झालेल्या हजारे यांना स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना उड्डाणपुलावर रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नवी बस्ती परिसरात घडली. शहर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.
जळगाव:पतंग उडविताना विहिरीत पडल्याने अक्षय महाजन या मुलाचा मृत्यू झाला.
अहमदनगर: गच्चीवरून पतंग उडवीत असताना भूषण शरद परदेशी (२२) तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. यात तो जखमी झाला.
५० वर प्रकरणे मकरसंक्रांतीला राज्यात दिवसभर पतंगबाजीचा उन्माद दिसून आला. मांजाने गळा चिरुन नागपुरात एका ११ वर्षीय मुलाचा, जळगावात विहिरीत पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. दिवसभरात धारदार मांजाने कोणाचा गळा, कोणाचा चेहरा, कोणाची बोटे, कोणाचा पाय कापला गेल्याची ५० वर प्रकरणे पुढे आली. यात लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती. नाशिकला तरुण इमारतीवरुन पडून जखमी झाला.
एकट्या नागपुरात ४० जखमी
पतंग पकडण्याच्या नादात आठवर्षांचा मुलगा घराच्या छतावरून खाली पडून गंभीर जखमी झाला. अपघात व मांजामुळे ४०हून अधिक जखमी झाले. वडिलांच्या दुचाकीवर बसून जात असलेल्या ११ वर्षाच्या वेदच्या मानेभोवती मांजाचा दोर आवळला आणि गळा चिरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.