अभिनव प्रयोगांमुळे विद्यापीठातली ‘मराठी’ टिकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:38 AM2018-02-27T02:38:46+5:302018-02-27T02:38:46+5:30
एका बाजूला शाळा-महाविद्यालयांमध्ये घटणारी मराठी विद्यार्थ्यांची संख्या, मराठी शाळांची दयनीय स्थिती चिंताजनक आहे. मात्र, दुसरीकडे मुंबई विद्यापीठाने हाच मराठीचा टक्का आणि दर्जा टिकवून ठेवण्यासाठी अभिनव प्रयोग राबविले आहेत.
मुंबई : एका बाजूला शाळा-महाविद्यालयांमध्ये घटणारी मराठी विद्यार्थ्यांची संख्या, मराठी शाळांची दयनीय स्थिती चिंताजनक आहे. मात्र, दुसरीकडे मुंबई विद्यापीठाने हाच मराठीचा टक्का आणि दर्जा टिकवून ठेवण्यासाठी अभिनव प्रयोग राबविले आहेत. परिणामी, विद्यापीठातील मराठी विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक असल्याने मराठीचे भविष्य अबाधित आहे, अशी प्रतिक्रिया मराठी विभाग भाषाप्रमुख डॉ. अनिल सपकाळ यांनी दिली.
मराठी भाषा विभागाने उपविभाग, वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासपद्धती, पूरक अभ्यासक्रम, प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविले. हे सर्व प्रयोग यशस्वी झाल्याने विद्यार्थीसंख्या संतुलित असल्याची माहिती विभागाचे प्रमुख डॉ. सपकाळ यांनी दिली. ते म्हणाले, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी मराठी भाषाच निवडतात. मराठी भाषेतूनच स्पर्धा परीक्षा देण्याला प्राधान्य देतात.
‘अमराठी विद्यार्थ्यांसाठी मराठी अभ्यासक्रम’ असे विविध उपविभाग व अभ्यासक्रम सुरू केले. प्रामुख्याने पत्रकारिता व पटकथालेखनाच्या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे. सध्या मुंबईत २५ महाविद्यालयांमध्ये अनुदानित मराठी भाषा विभाग आहेत. जर सर्व महाविद्यालयांच्या मराठी भाषा विभागांमधील विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर, मराठी भाषा विभागात शिकणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याचे पाहायला मिळेल. विद्यापीठाच्या भाषा विभागाचे संशोधक सहायक गुरुनाथ कलमकर म्हणाले की, मराठी भाषा विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी (एम.ए.) १०० ते ११० एवढी संख्या होती. आता या विभागात पार्ट १ आणि पार्ट २ असे दोन उपविभाग करण्यात आले आहेत. दोन्ही विभागांत मिळून दरवर्षी ११० ते १२० विद्यार्थी शिकतात. तसेच एम. फिल आणि पीएच.डी.साठीदेखील दोन्ही मिळून ७५ ते ८० विद्यार्थी असतात. ही संख्या जुन्या विद्यार्थी संख्येइतकीच आहे.