देखाव्यांतून गणेशभक्तांना पर्यटनाची सफर
By Admin | Published: August 12, 2016 02:46 AM2016-08-12T02:46:27+5:302016-08-12T02:46:27+5:30
देशातील विविध पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे लोकांना वेळेअभावी किंवा आर्थिक टंचाईअभावी प्रत्यक्ष जाऊन पाहणे शक्य होत नाहीत.
मुंबई : देशातील विविध पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे लोकांना वेळेअभावी किंवा आर्थिक टंचाईअभावी प्रत्यक्ष जाऊन पाहणे शक्य होत नाहीत. त्यामुळे या पर्यटनस्थळांचे, मंदिराचे देखावे साकारत मुंबईकरांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचा निर्धार लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीने केला आहे. त्याप्रमाणे, यंदाही उत्तराखंड येथील बद्रिनाथ मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशगल्ली मंडळाची स्थापना १९२८ साली झाली. २२ फूट उंच गणेशमूर्ती आणि आकर्षक भव्य दिव्य सजावट हे या मंडळाचे मुख्य वैशिष्ट्य समजले जाते. ‘भव्यतेची परंपरा, संस्कृतीची जोपासना’ हे ब्रीदवाक्य मिरवत, गेली अनेक वर्षे या मंडळाचा देखावा गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
मदुराईचे मीनाक्षी मंदिर, राजस्थानचे हवा महल, गुजरातचे अक्षरधाम, हिमालय केदारनाथ मंदिर, म्हैसूरचे चामुंडेश्वरी मंदिर अशा एक ना अनेक भव्य हुबेहूब प्रतिकृती मंडळाने साकारल्या. दरवर्षी थाटामाटात नवरात्रौत्सवही हे मंडळ साजरे करते.
गुणवत्तेला प्रोत्साहन
स्थानिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तींचे वाटप केले जाते. शिवाय, विद्यार्थ्यांचा सत्कारही केला जातो. स्पर्धा परीक्षांमध्ये सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरही कौतुकाची थाप दिली जाते. कारगिल मदत निधी कारगिल युद्धाच्या वेळी शासनाच्या आवाहनानंतर मंडळाने एक लाख रुपयांचा कारगिल मदत निधी जमविला होता. शिवाय, नैसर्गिक आपत्तींमध्येही मदतीचा हात देण्यासाठी मंडळ नेहमीच पुढाकार
घेत असते. जांभूळपाडा मदतकार्य
१९८१-९० सालादरम्यान पनवेल येथील जांभूळपाड्याला पुराचा तडाखा बसला होता. त्या वेळी तेथील विस्कळीत जनजीवनाला मदतीचा हात देण्यासाठी गणेशगल्लीचे मंडळ धावून गेले होते. तेथे जीवनावश्यक वस्तूंचेही वाटपही करण्यात आले होते.आरोग्याचीही काळजी
मंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर, चष्मा वाटप, नेत्रतपासणी, रक्तदान अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते.यात सर्व वयोगटातील सदस्यांना सहभागी करून घेतले जाते. केईएम रुग्णालयात व्हीलचेअरचेही वाटप करण्यात आले होते.