Join us

सातासमुद्रापारही गोविंदा रे गोविंदा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 12:22 PM

महिलांमध्येही काही गोविंदा पथकांनी परदेशात जाऊन दहीहंडी खेळाचे सादरीकरण केले आहे.

मुंबई- लहानमोठ्यांप्रमाणेच सातासमुद्रापार परदेशातील नागरिकांनाही या मराठमोळ्या दहीहंडी खेळाची जबरदस्त क्रेझ आहे. अनेक परदेशी नागरिक दहीहंडी पाहण्यासाठी गोकुळाष्टमी काळात मुंबई, ठाणे, पुण्यात मुक्कामासाठी येतात. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राची ही संस्कृती सातासमुद्रापार नेण्यासाठी मुंबईतील काही पुरुष आणि महिला गोविंदा पथकांच्या गोविंदांनीही परदेशवारी केली आहे. राज्य सरकारने पर्यटन व सांस्कृतिक विभाग तसेच गोविंदा समन्वय समितीच्या माध्यमातून दहीहंडीचा हा खेळ सातासमुद्रापार लोकप्रिय केला आहे.

महिलांमध्येही काही गोविंदा पथकांनी परदेशात जाऊन दहीहंडी खेळाचे सादरीकरण केले आहे. यामध्ये सर्वात जुने १० वर्षे पूर्ण झालेले चुनाभट्टी येथील दोस्ती महिला गोविंदा पथकाने न्यूयॉर्कमध्ये दहीहंडी खेळाचे सादरीकरण केले आहे. मुंबईत सर्वात आधी पाच थर लावणारे महिला पथक म्हणून दोस्ती महिला गोविंदा पथक प्रसिद्ध आहे. सातत्य आणि नियोजनपूर्ण सराव या जोरावर महिला गोविंदाही पुरुषांप्रमाणे दहीहंडी खेळाचे उत्तम सादरीकरण करू शकतात हे अनेक भागात जाऊन दहीहंडी फोडून दोस्ती महिला पथकाने सिद्ध केले आहे.

दोस्ती महिला गोविंदा पथकाची दखल घेत समन्वय समिती आणि सरकारने त्यांना अमेरिकेत दहीहंडी खेळाचे सादरीकरण करण्यास निमंत्रण दिले होते, अशी माहिती दोस्ती महिला गोविंदा पथकांच्या अध्यक्षा अॅड. राणी येरुणकर यांनी दिली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन परदेशात घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र दहीहंडी पथक स्पेनला गेले होते. दहीहंडी समन्वय समिती तर्फे १८ गोविंदांचे पथक स्पेन येथे आपली कला सादर करून आले आहेत. स्पेनच्या 'टेरेगोना ह्युमन टॉवर स्पर्धेमध्ये हे गोविंदा पथक सहभागी झाले होते. ही स्पर्धा ऑक्टोबर २०१८ मध्ये स्पेन टरेको अरेना प्लागा ऑफ रेगोना नावाने झाली होती. या स्पर्धेत ४२ ग्रुप्स सहभागी होत होते.

पुरुषामध्येही जय जवान गोविदा पथक, यंग उमरखाडी गोविंदा पथक, श्रीदत्त गोविंदा पथक माझगाव ताडवाडी गोविदा पथक, खोपटाचा राजा गोविंदा पथक, सह्यादी गोविंदा पथकाचे परदेशात जाऊन दहीहंडी खेळाचे सादरीकरण केले आहे. त्यामध्ये यंग उमरखाडी गोविंदा पथकाने २००६ मध्ये अमेरिकेत दहीहंडीचे सादरीकरण केले. • जय जवान पथकाने स्पेन आणि अमेरिकेत सादरीकरण केले आहे. २०१८ आणि २०२२ मध्ये गोविंदा पथके सातासमुद्रापार गेली आहेत, असे दहीहंडी असोसिएशनचे सचिव कमलेश भोईर यांनी सांगितले.

उमरखाडीत पौराणिक देखाव्यांवर भर

उमरखाडी सार्वजनिक गोकुळ काला मंडळाच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षे साजरे केले जात आई. ७ सप्टेंबर रोजी उमरखाडी- डोंगरी- जेजे रुग्णालय-दोन टाकी-कुंभारवाडा- गिरगाव ठाकूरद्वार- मुंबादेवी- चिंचबंदर विभागात वाद्य, बैंड पथक, बॅजो पार्टी, चौघडा, डोल ताशांच्या तालावर हंडी फोडत पौराणिक देखाव्यांसह मिरवणूक काळण्यात येणार आहे. पाच मोठया ट्रकवर चित्ररथाद्वारे पौराणिक देखावे दाखविले जातात, अशी माहिती मंडळाचे प्रसाद भोसले यांनी यावेळी दिली.

टॅग्स :दहीहंडी