मतदार जागृती मंचच्या माध्यमातून रा.स्व.संघाची निवडणुकीमध्ये उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 07:43 AM2019-04-03T07:43:52+5:302019-04-03T07:44:14+5:30
या मंचच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकार वा राज्य सरकारच्या विकासकामांचा प्रचार केला जाणार नाही
यदु जोशी
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी मतदार जागृती मंचच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली आहे. राष्ट्रीय विचारधारेच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन या मंचच्यावतीने केले जात असून त्या निमित्ताने एकप्रकारे पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी संघ परिवाराने कंबर कसली आहे.
या मंचच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकार वा राज्य सरकारच्या विकासकामांचा प्रचार केला जाणार नाही. मात्र राष्ट्रीयत्वाचा विचार समोर ठेऊन कोणाला मतदान करणे आवश्यक आहे हे सांगत मोदीच पुन्हा पंतप्रधान होणे कसे आवश्यक आहे, हे पटवून सांगितले जात आहे. त्यासाठी संघाचे स्वयंसेवक विविध समाजघटकांशी संपर्क करीत आहेत. प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघनिहाय अशी मंचची यंत्रणा उभी करण्यात आली असून त्याचे काम १५-२० दिवसांपासून सुरू करण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
‘अजिबात मतदान न करणे वा नोटाचा वापर करणे याचा फायदा सर्वाधिक निष्क्रिय उमेदवाराला मिळतो’, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमी उत्सवात म्हटले होते.
मंचची दोन प्रमुख उद्दिष्टे
मतदार जागृती मंचची दोन प्रमुख उद्दिष्टे असतील. एक म्हणजे संघ कार्यकर्त्यांच्या यंत्रणेचा उपयोग करून जास्तीतजास्त मतदान करण्यावर भर दिला जात आहे. आपापल्या वस्त्यांमध्ये सकाळी ११ पर्यंतच बव्हंशी मतदान झालेले असेल, याची काळजी घेतली जाईल. त्यासाठी स्वयंसेवकांची फळी कार्यरत असेल. दुसरे म्हणजे ‘नोटा’चा वापर करण्यात येऊ नये यासाठी जागृती केली जात आहे.