Join us  

Video: फुलांची उधळण, शरद पवारांना हस्तांदोलन; कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून प्रतिभाताई भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 3:20 PM

अजित पवारांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झालीय. मात्र, पवारांचा उत्साह पाहून कार्यकर्ता शरद पवारांचे जल्लोषात स्वागत करत आहे.

मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार पुन्हा पायाला भिंगरी लावल्यागत जनतेच्या मैदानात उतरले आहेत. पुतण्या आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं असून आपला अजित पवारांना पाठिंबा नसल्याचे शरद पवारांनी म्हटलंय. विशेष म्हणजे शरद पवार हे लोकांमध्ये जाऊन लोकांना आपलंस करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, अजित पवारांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झालीय. मात्र, पवारांचा उत्साह पाहून कार्यकर्ता शरद पवारांचे जल्लोषात स्वागत करत आहे. 

महाराष्ट्र पातळीवर दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आता राज्याचे राजकारण ढवळून काढणार असले तरी ज्येष्ठ नेते शरद पवार यातून तेल लावलेल्या पैलवानासारखे पकडीतून सुटले आहेत. सर्वांपेक्षा अनुभवाने आणि वयाने मोठे असलेले हे पैलवान सर्वांत आधी सोमवारी गुरुवर्यांचे स्मरण करून मैदानात उतरले आहेत. आज पुण्याहून मुंबईकडे येत असताना ठिकठिकाणी शरद पवारांचं मोठं स्वागत करण्यात आलं. 

पुण्याहून मुंबईकडे येत असताना त्यांच्या गाडीत शेजारीच पत्नी प्रतिभाताई पवार बसल्या होत्या. शरद पवारांची गाडी नवी मुंबईत आल्यानंतर रस्त्यावरच कार्यकर्त्यांनी गाडीला गराडा घातला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार... शरद पवार... असे म्हणत कार्यकर्त्यांनी आम्ही तुमच्यासोबत असल्याचे दाखवून दिले. तसेच, यावेळी, शरद पवारांच्या गाडीवर फुलांची उधळणही करण्यात आली. हस्तांदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांवरील कार्यकर्त्यांचं हे प्रेम पाहून शेजारीच बसलेल्या प्रतिभाताई पवार भावुक झाल्याचं दिसून आलं. एकंदरीत शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली असून ह्या फूटीमुळे काका-पुतण्यात काहीसा दुरावा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. 

महाराष्ट्रात एका पक्षाला बहुमत मिळण्याचे दिवस १९९० मध्ये मावळले. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत आघाडी किंवा युतीची लढाई होत राहिली. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या चार राजकीय पक्षांच्या भोवती गेली तीस वर्षे महाराष्ट्राचे राजकारण घोंगावते आहे. त्यात २०१४ च्या विधान सभा निवडणुकांनंतर उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी संपुष्टात आली. भाजप आणि शिवसेनेची युतीही विस्कटली. चारही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविल्यांतर भाजप प्रथमच महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. विद्यमान सभागृहातदेखील भाजप सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे. 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारमुंबई