मुंबई :मुंबईकरांसाठी मुंबई पालिका प्रशासनाने संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत रस्ते, पदपथ, गटर आणि नाल्यांची स्वच्छता केली जात आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्या ठिकाणी परिसरात नागरिकांनी पुन्हा कचरा टाकू नये, अन्यथा स्वच्छतेसाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरतात. कोणत्याही ठिकाणी नाल्यांमध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पालिकेकडून २४ प्रभागात संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, पश्चिम उपनगराचे अतिरिक्त पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही व्यापक कार्यवाही केली जात आहे. मात्र, नाल्यांमध्ये नागरिकांकडून वारंवार कचरा टाकला जात आहे.
२८१ मोठे नाले :
सध्या मुंबईत २८१ मोठे नाले असून, त्यांची लांबी २७० किमी आहे. यामध्ये मुंबई शहरात २९, पूर्व उपनगरात ११४, पश्चिम उपनगरात १३८ नाले आहेत. लहान आकाराच्या नाल्यांची संख्या १४९० असून, शहरात २०२ असून, पूर्व उपनगरात ९९४ आणि पश्चिम उपनगरात २९४ लहान नाले आहेत.
या वस्तूंचा समावेश:
या कचऱ्यामध्ये थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॅपर्स असा विविध प्रकारच्या तरंगत्या वस्तूंचा (फ्लोटिंग मटेरिअल) समावेश आहे. अशा स्वरूपाचा कचरा नाल्यात टाकल्याने सांडपाणी वहन, निचरा होण्यास अडथळे निर्माण होतात.
नाल्यांभोवती जाळ्या:
नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी पालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवीत आहे. नाल्यातून गाळ आणि कचरा बाहेर काढण्याचे काम नियमितपणे सुरू आहे. नाल्यांमध्ये येणाऱ्या कचऱ्यास प्रतिरोध करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन छोट्या नाल्यांच्या ठिकाणी जाळ्या लावता येतील का, अथवा ते नाले बंदिस्त करता येतील का ? तसेच मोठ्या नाल्यांच्या ठिकाणी स्क्रिनिंग किंवा नेटचा पर्याय वापरता येईल का? याबाबतची चाचपणी करीत आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी जाळी बसविण्यात आली आहे.