'शाईफेक ही संभाजी ब्रिगेडची उत्सफूर्त प्रतिक्रिया'; प्रवीण दरेकरांकडून गिरीश कुबेरांवरील शाईफेकीचे अप्रत्यक्ष समर्थन?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 04:29 PM2021-12-05T16:29:45+5:302021-12-05T16:41:00+5:30
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर नाशिकमध्ये होत असलेल्या साहित्य संमेलनात संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक करण्यात आली आहे.
नाशिक: ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर नाशिकमध्ये होत असलेल्या साहित्य संमेलनात संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक करण्यात आली आहे. संभागी ब्रिगेडच्या दोन जणांकडून त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी शाई फेकणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं. दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या या शाईफेकीचे भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून अप्रत्यक्षपणे समर्थन करण्यात आलं आहे.
कुबेर यांच्यावर शाई फेकल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, 'संभागी ब्रिगेडच्या लोकांना आम्ही शाई फेकायला सांगितली नाही. पण, ती त्यांची उत्सफूर्त प्रतिक्रिया होती. त्यांना वेगळ्या मार्गाने प्रतिक्रिया देता आली असती, लिखाण करता आलं असतं. प्रत्येकाची पद्धत असते, काही लोक लेखणीतून वार करतात तर संभाजी ब्रिगेडची काम करण्याची पद्धत आक्रमक आहे, असं दरेकर म्हणाले.
उगाच अकलेची तारे तोडले जातात
'कारण नसताना वाद-विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यातलाच हा एक प्रकार आहे. संभाजी महाराज असो की स्वातंत्र्यवीर सावरकर असोत, ही सर्व आमची दैवतं आहेत. त्यांच्याविषयी कारण नसताना अकलेची तारे तोडले जातात. काही लोकांना वाटतं मोठ्या पुरुषांवर वक्तव्य केली तर वाद तयार होईल आणि आपण चर्चेत राहू. त्यामुळेच हे लोक बरळत असतात', असंही ते म्हणाले.
महाराजांविरोधात लिखाण सहन करणार नाही
दरेकर पुढे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजही आमचं दैवत आहे. संभाजी महाराजांवर आक्षेपाहार्य लिहिलं गेलं असेल आणि शाई फेकली असेल तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही. त्यांच्याबद्दल चुकीचे लिखाण राज्यातील स्वाभिमानी माणूस सहन करणार नाही. एखाद्या अज्ञानी आणि समज नसलेल्या माणसाने एखादी गोष्ट केली तर समजू शकतो. पण जी लोकं स्वत:ला विद्वान समजतात. ज्यांच्या लेखणीतून संस्कार द्यायचे असतात, त्यांनीच जर वातावरण कलुषित करणाऱ्या गोष्टी केल्या असतील तर त्या चुकीच्या आहेत. मोठ्या पदावरील लोकांनी भान ठेवलं पाहिजे. त्यांच्या बातमी आणि अग्रलेखाने समाजवर परिणाम होत असतो, असही दरेकर म्हणाले.