प्रवाशाला चालत्या रेल्वेतून फेकले
By Admin | Published: September 8, 2016 03:45 AM2016-09-08T03:45:21+5:302016-09-08T03:45:21+5:30
रेल्वे प्रवाशाला लुबाडून चालत्या रेल्वेतून फेकून दिल्याचा प्रकार सीबीडी स्थानकालगत घडला आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी जबाबदारी झटकत जखमीची सुमारे दोन तास हेळसांड केली
नवी मुंबई : रेल्वे प्रवाशाला लुबाडून चालत्या रेल्वेतून फेकून दिल्याचा प्रकार सीबीडी स्थानकालगत घडला आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी जबाबदारी झटकत जखमीची सुमारे दोन तास हेळसांड केली. पनवेलऐवजी वाशी हद्दीत घटना घडल्याचे सांगितले तरच मदत मिळेल या अटीवर सीबीडी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्याचाही आरोप या प्रवाशाने केला आहे.
ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर एका घटनेत बेलापूरचे रहिवासी गिरीधारी मसंता (४५) यांचे थोडक्यात प्राण बचावले आहेत. या घटनेमुळे रेल्वे पोलीस जबाबदारी ढकलण्याच्या प्रयत्नात प्रवाशांच्या जिवाशी देखील खेळ करत असल्याचे समोर आले आहे. २० आॅगस्टच्या रात्री ते पनवेल लोकलने ऐरोली येथून बेलापूरच्या दिशेने चालले होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही लोकल नेरुळ स्थानकात आली असता मसंता ज्या डब्यात बसले होते त्यामधील इतर सर्व प्रवासी खाली उतरले. यावेळी ते एकटेच असताना अज्ञात तिघे जण त्या डब्यामध्ये आले. सीवूड स्थानक गेल्यानंतर त्या तिघांनी मसंता यांना मारहाण करत लुटायला सुरवात केली. प्रथम त्यांनी प्रतिकार केला असता तिघांपैकी एकाने त्यांच्या गळ्याला चाकू लावला. शिवाय हातातली अंगठी निघत नसल्यामुळे वेळ पडल्यास बोटे तोडण्याची धमकी दिली. अखेर भीतीपोटी मसंता यांनी त्यांचा मार सहन करत स्वत:कडील दागिने, रोख रक्कम व मोबाइल तसेच बॅग त्या तिघांकडे सुपूर्द केली. त्यानंतर सीबीडी स्थानकापूर्वी पुलालगत त्या तिघांनी मसंता यांना उचलून चालत्या रेल्वेतून खाली फेकून दिले.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मसंता यांनी जवळचे सीबीडी स्थानक गाठले. परंतु त्याठिकाणी रेल्वे पोलिसांकडून मदतीऐवजी त्यांची असंवेदनशीलता अनुभवायला मिळाली. तुमच्याकडे उपचारासाठी पैसे असतील तरच रुग्णालयात नेतो असे बजावत सुमारे दीड तास त्यांना बसवून ठेवले. अखेर एका मोटरमनने मसंता यांची अवस्था पाहून स्वत:कडील ३०० रुपये देवून तत्काळ रुग्णालयात जाण्यास सुचवले. त्यानंतरही अर्ध्या तासाने रेल्वेने वाशीला व तिथून पालिका रुग्णालयात नेल्याचे गिरीधारी मसंता यांनी सांगितले. परंतु रुग्णालयातही पूर्ण उपचार न घेवू देता काही मिनिटांतच वाशी रेल्वेस्थानकात आणून घटना वाशी हद्दीतलीच आहे असे सांगण्याचा दम देत तक्रारीत तसे नमूद करून घेतल्याचा आरोप मसंता यांनी केला आहे.