प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:17 AM2020-11-26T04:17:36+5:302020-11-26T04:17:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या गाडीवर मनसे विभागप्रमुख योगीराज देशमुख यांनी दुपारी दगडफेक केली. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या गाडीवर मनसे विभागप्रमुख योगीराज देशमुख यांनी दुपारी दगडफेक केली. या हल्ल्याचा शहरातून निषेध व्यक्त हाेत असून प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून मध्यवर्ती पाेलिसांनी त्यांना अटक केली असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डी. टी. टेळे यांनी दिली.
सरकारी आरक्षित भूखंडावर बांधकाम होत असल्याच्या तक्रारींची दखल न घेतल्याने ही कृती केल्याची कबुली देशमुख यांनी दिली. तर देशमुख कोरोना काळात भेटले नसून त्यांच्या तक्रारी प्रलंबित नसल्याचे गिरासे यांनी पत्रकारांना सांगितले. उल्हासनगर प्रांत कार्यालय प्रांगणात उभ्या असलेल्या प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या गाडीवर मनसे विभागप्रमुख योगीराज देशमुख यांनी हा हल्ला केला. दगड लागून गाडीची काच फुटली आहे. देशमुख यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून राज्य शासनाच्या आरक्षित भूखंडावर शासनाचा नामफलक लावूनही बेकायदा बांधकामे सुरू आहेत, अशी तक्रार प्रांत कार्यालयाकडे केली. मात्र, त्याकडे प्रांताधिकारी कार्यालयाने दुर्लक्ष करून मला कार्यालयात येण्यास मज्जाव केला, असे म्हटले आहे. मंगळवारी याबाबत विचारणा करण्यासाठी प्रांत कार्यालयात गेल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या निषेधार्थ प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीवर दगड भिरकावल्याची कबुली त्यांनी दिली. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी प्रांताधिकारी यांच्या गाडीवरील हल्ल्याचा निषेध केला असून पक्षश्रेष्ठी पुढील निर्णय घेतील, असे सांगितले.