दैव बलवत्तर! विसाव्या मजल्यावरून फेकले, तरी ती जिवंत... ; मुंबईतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 09:42 AM2022-07-30T09:42:39+5:302022-07-30T09:45:21+5:30

या घटनेसंदर्भात माहिती अशी की, गोरेगावच्या शंकरनगरमध्ये पीडित २६ वर्षीय महिला ही पती व मुलांबरोबर राहते

Thrown from the 20th floor of building, but girl alive... ; Shocking incident in Mumbai | दैव बलवत्तर! विसाव्या मजल्यावरून फेकले, तरी ती जिवंत... ; मुंबईतील धक्कादायक घटना

दैव बलवत्तर! विसाव्या मजल्यावरून फेकले, तरी ती जिवंत... ; मुंबईतील धक्कादायक घटना

Next

गौरी टेंबकर - कलगुटकर 

मुंबई : तुला काम देतो, असे सांगत २० मजली इमारतीच्या गच्चीवरून मोलकरणीला खाली फेकल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मालाडमध्ये घडला. मात्र, नशीब बलवत्तर असलेल्या मोलकरणीचा जीव वाचला. ती अठराव्या मजल्याच्या खिडकीत अडकली. महत्प्रयासानंतर तिची सुखरूप सुटका करण्यात आली.

या घटनेसंदर्भात माहिती अशी की, गोरेगावच्या शंकरनगरमध्ये पीडित २६ वर्षीय महिला ही पती व मुलांबरोबर राहते. ती मालाड पश्चिमच्या सुंदर नगरमधील ब्ल्यू होरायझन इमारतीत घरकाम करते. त्याच इमारतीमध्ये काम करणाऱ्या आरोपी सिंग याच्याशी वर्षभरापूर्वी तिची ओळख झाली. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती ब्ल्यू होरायझन इमारतीत कामासाठी गेली होती. तिथे बी विंगचा सुरक्षारक्षक सिंग याने तिला थांबवत ए विंगच्या विसाव्या मजल्यावर फ्लॅट २००१ मध्ये राहायला आलेल्या मॅडमकडे धुणीभांडी करण्याचे काम असल्याचे सांगितले. एका दिवसाच्या कामाचे तीन हजार रुपये मिळतील, असे सिंगने पीडितेला सांगितले. त्यावर निश्चित कामाची हमी पीडितेने सिंगकडे मागितली. संबंधित मॅडमशी बोलून ठरवून घे, असे सिंग म्हणाला. 

विसाव्या मजल्यावर पोहोचताच सिंगने संबंधित मॅडमला फोन केला. त्यांना येण्यास अर्धा तास लागणार आहे, त्यांच्या लहान मुलाचे गच्चीवर ठेवलेले कपडे महिलेला घेऊन जाण्यास सांगितले आहे, असे सिंग म्हणाला. तेव्हा महिला गच्चीच्या दिशेने वळली आणि सिंगने मागून तिचा गळा आवळत खाली पाडले व खाली फेकून देत स्वतः पसार झाला. 

ग्रील कापून बाहेर काढले!

महिलेला सिंगने फेकले, तेव्हा ती १८व्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटच्या खिडकीला अडकली आणि जिवाच्या आकांताने ओरडू लागली. तिचा आवाज फ्लॅटमधील महिलेने ऐकला आणि काही वेळातच अग्निशमन दल व पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. तातडीने बचाव कार्य सुरू करत खिडकीची ग्रील जवानांनी कापली आणि तिला तिथून उतरवले. तिला उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपाचाराअंती घरी सोडण्यात आले. 

अनैतिक संबंध की दरोडा?

आरोपी सिंगचे महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आम्हाला असून दरोड्याच्या अनुषंगाने हा प्रकार घडला आहे का, याचीही चौकशी आम्ही करत आहोत. दरम्यान सिंग याच्यावर भारतीय दंड विधान संहितेचे कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. 

"मुलगी वाचली हे नशीब" 

आमची मुलगी वाचली हे नशीब आहे. खासगी रुग्णालयामार्फत तिच्यावर उपचार सुरू असून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, पायातील पैंजण गायब आहे, असे कुटुंबीयांनी सांगितले.

Web Title: Thrown from the 20th floor of building, but girl alive... ; Shocking incident in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.