मान्सूनपूर्व कामांवर पालिका-रेल्वेचा ‘जोर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:48 PM2018-04-18T23:48:42+5:302018-04-18T23:48:42+5:30
पश्चिम रेल्वेच्या हद्दीत असणाऱ्या महापालिकेच्या ४३ कल्व्हर्टच्या सफाई व अभियांत्रिकी कामांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची तयारी पश्चिम रेल्वेने दर्शविली आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हद्दीत असणाऱ्या महापालिकेच्या ४३ कल्व्हर्टच्या सफाई व अभियांत्रिकी कामांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची तयारी पश्चिम रेल्वेने दर्शविली आहे. पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील फेरीवाले हटविण्याकरिता आणि ट्रॅकवरील कचºयाचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने
रेल्वेला सहकार्य करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने दर्शविली आहे.
येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येणाºया नालेसफाई कामांसह विविध स्तरीय कामे सध्या पूर्ण वेगाने सुरू आहेत. याच अनुषंगाने चर्चगेट ते दहिसर दरम्यान पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील ४३ कल्व्हर्टची कामे वेळेत व योग्य प्रकारे होऊन पावसाच्या पाण्याचा प्रभावी निचरा व्हावा, या उद्देशाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्वत: पुढाकार घेऊन व पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात जाऊन पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता यांच्याशी संवाद साधला. बैठकी दरम्यान पश्चिम रेल्वे व महापालिका यांच्या समन्वयनातून जी विविध कामे होणे अपेक्षित आहे, त्याबाबत सविस्तर चर्चा होऊन कामांची पुढील दिशा निश्चित करण्यात आली.
त्यानुसार, चर्चगेट व दहिसर दरम्यान असणाºया ४३ कल्व्हर्टची सफाई कामे करण्यात येणार आहेत, तसेच काही कल्व्हर्टची अभियांत्रिकी कामेदेखील करण्यात येणार
आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबई सेंट्रलजवळील कल्व्हर्ट क्रमांक
५ व ७, एल्फिन्स्टन रोड स्टेशनजवळील कल्व्हर्ट, माटुंगा रोड यार्डजवळील कल्व्हर्ट क्रमांक १५, खार पश्चिम परिसरातील चमडावाडी नाल्यावर असणारा कल्व्हर्ट क्रमांक २४ व २४ ए, वांद्रे टर्मिनस यार्डजवळील कल्व्हर्ट क्रमांक २५ व २६, गोरेगाव-मालाड या स्टेशनदरम्यान असणारे कल्व्हर्ट क्रमांक ५३ व क्रमांक ५४ इत्यादी कल्व्हर्टचा समावेश आहे.
ही केली जाणार कामे
एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या खालून एक पर्जन्यजल वाहिनी जाते. या जलवाहिनीवरील पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील कल्व्हर्टच्या विस्तारीकरणाचे काम पश्चिम रेल्वेद्वारे करण्यात येत असून, हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. हीच जलवाहिनी पुढे जाऊन फितवाला रोड जंक्शनखाली असणाºया पर्जन्यजल वाहिनीला जोडलेली आहे.
पश्चिम रेल्वेद्वारे सुरू असलेल्या कामामुळे सदर पर्जन्य जलवाहिनीद्वारे अधिक प्रमाणात पाण्याचा निचरा होण्याची शक्यता लक्षात घेऊन, महापालिकेद्वारेदेखील फितवाला रोड जंक्शनपासून खाली जाणाºया जलवाहिनीच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी होणाºया कामांमुळे एल्फिन्स्टन रोड परिसरातील पाण्याचा निचरा अधिक गतीने होईल.
खार व वांद्रे स्टेशनांच्या दरम्यान चमडावाडी नाल्यावरील कल्व्हर्ट क्रमांक २४ व २४ ए मधून जाणाºया ५७ इंची जलवाहिनीमुळे, पाण्याच्या प्रवाहात अडथळा उत्पन्न होत होता. ही जलवाहिनी वळविण्याचे काम महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे हाती घेतले जात आहे. याबाबतदेखील आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे पश्चिम रेल्वेने मान्य केले. यामुळे खार पश्चिम परिसरातील जय भारत सोसायटी आणि रेल्वे कॉलनी इत्यादी परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने होऊन, या परिसरांना दिलासा मिळेल.
मॅनहोल बंद करण्यावर चर्चा
खुले मॅनहोल बंद करण्याच्या कार्यवाहीबाबत बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मुंबई सेंट्रलजवळील महापालिकेच्या कल्व्हर्ट क्रमांक ७ चे मॅनहोल हे पश्चिम रेल्वेच्या कामांदरम्यान जमिनीत गाडले गेल्याने, साफसफाई करण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे जमिनीत गाडल्या गेलेल्या या मॅनहोलची उंची वाढविणे आवश्यक आहे. हे काम महापालिकेद्वारे करण्यात येणार असून, यासाठी पश्चिम रेल्वे आवश्यक ते सहकार्य करणार आहे, तर एल्फिन्स्टन रोडजवळच्या कल्व्हर्ट क्रमांक ११ चे मॅनहोल सुव्यवस्थित करण्याची व बसविण्याची कार्यवाही पश्चिम रेल्वेद्वारेच केली जाणार आहे.