Join us

आरेमध्ये बिबट्याचा थरार!

By admin | Published: March 22, 2017 1:50 AM

तीन वर्षांच्या मुलाला उचलून पळत असलेल्या बिबट्याच्या तावडीतून मुलाला वाचविण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीचा थरार सोमवारी आरेमध्ये घडला.

मुंबई : तीन वर्षांच्या मुलाला उचलून पळत असलेल्या बिबट्याच्या तावडीतून मुलाला वाचविण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीचा थरार सोमवारी आरेमध्ये घडला. मात्र याच आईच्या धाडसामुळे तीन वर्षांच्या मुलाची सुटका झाली. या थरारक घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. आरे येथील चाफ्याचा पाडा येथे प्रमिला रिंजत (२८) या कुटुंबीयासोबत राहतात. सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास प्रमिला या स्वच्छतागृहात गेल्या तर वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे प्रणय घरी एकटाच होता. खेळत खेळत तो घराच्या व्हरांड्यात आला. त्या वेळी अचानक जवळच्या झाडाझुडपात लपून बसलेल्या बिबट्याने प्रणयवर झडप मारली. त्याच्या हल्ल्याने घाबरलेला प्रणय जोरजोरात रडू लागला. हा सगळा आदिवासी विभाग असल्याने काही अंतरावर स्थानिकांनी त्याचा आवाज ऐकला. काहीतरी गडबड असल्याचे वाटल्याने त्यांनी तातडीने प्रणयच्या घराजवळ धाव घेतली. तेव्हा बिबट्याने घट्ट धरून ठेवलेला आणि जिवाच्या आकांताने ओरडणारा प्रणय त्यांना दिसला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी हातातील लाठ्याकाठ्यांनी बिबट्याला घाबरविण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्या प्रणयला खेचून सोबत नेण्याचा प्रयत्न करू लागला. ही बाब त्याच्या आईला समजताच तिने त्याच्याकडे धाव घेतली. धाडसाने पुढे जात बिबट्याच्या तावडीतून चिमुरड्याची सुटका केली. तिच्या या धाडसाने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. स्थानिकांच्या मदतीने प्रणयला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, असे आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ओऊळकर यांनी सांगितले. या प्रकरणी वन विभागालादेखील कळविण्यात आले आहे. अन्नाच्या शोधात तो बिबट्या मानवी वस्तीत आला असावा आणि प्रणयला एकटे पाहून त्याने त्याच्यावर हल्ला केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)