‘पोकेमॉन गो’मुळे ठाण्यातील तरुणाई मॅड

By admin | Published: July 24, 2016 03:45 AM2016-07-24T03:45:46+5:302016-07-24T03:45:46+5:30

सध्या मोबाइलवर गाजत असलेल्या ‘पोकेमॉन गो’ या गेमने ठाण्यातील तरुणाईला अक्षरश: वेड लावले असून या खेळामुळे रस्त्यात अपघात होऊ लागले आहेत. काही तरुणी पोकेमॉनला

Thunderbolt Madan by 'Pokémon Go' | ‘पोकेमॉन गो’मुळे ठाण्यातील तरुणाई मॅड

‘पोकेमॉन गो’मुळे ठाण्यातील तरुणाई मॅड

Next

ठाणे : सध्या मोबाइलवर गाजत असलेल्या ‘पोकेमॉन गो’ या गेमने ठाण्यातील तरुणाईला अक्षरश: वेड लावले असून या खेळामुळे रस्त्यात अपघात होऊ लागले आहेत. काही तरुणी पोकेमॉनला शोधत येऊरच्या जंगलात गेल्याची चर्चाही कानांवर येत आहे. त्यामुळे हा खेळ जरी मुलांचा असला तरी घोर मात्र पालकांच्या जीवाला लागला आहे.
मोबाइलमधील गेम हे लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंतचा विरंगुळ्याचे साधन आहे. आतापर्यंत आबालवृद्ध रेल्वे, बसगाड्या, हॉटेल आदी ठिकाणी तासन्तास बसून गेम खेळताना दिसत होती. मात्र, ‘पोकेमॉन गो’ या खेळात ठाण्यातील प्रत्यक्ष रस्त्यावर फिरून तरुण मुलेमुली पोकेमॉनचा शोध घेत असल्याचे दिसू लागले आहे. काहींंना तर पोकेमॉनचे व्यसन लागले आहे. १५ ते २५ वयोगटांच्या मुलामुलींमध्ये लोकप्रिय ठरलेल्या पोकेमॉन गेमने तरुणाईला इतके वेड लावले आहे की, वाहन चालवताना मुलेमुली हा गेम खेळू लागली आहेत. मोटारसायकल, स्कूटीवर महाविद्यालयातील मुलामुलींचा ग्रुप बसतो. एकाच विभागातील पोकेमॉन शोधण्याकरिता त्यांच्या दुचाकी वाहनांची झुंड निघते. सर्वात अगोदर पोकेमॉनला पकडण्याकरिता भरधाव वेगात ते दुचाकी चालवतात, असे ठिकठिकाणी अनुभवास येत आहे.
‘हरिओमनगर’ येथे राहणारे दोन मित्र पोकेमॉनला शोधण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दोघांनीही आपापल्या मोबाइलमध्ये पोकेमॉनला लोकेट केले होते. धक्कादायक बाब म्हणजे गाडी चालवणारा एका हातात मोबाइल घेऊन दुसऱ्या हाताने गाडी चालवत होता, तर मागे बसलेला मोबाइलमध्ये पोकेमॉनचे लोकेशन पाहून त्याला सूचना करीत होता. या नादात हे दोघे चालले असताना त्यांना समोर थांबलेली गाडी दिसली नाही आणि त्या गाडीवर आदळून खाली पडतापडता वाचले, असे याच परिसरात राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राने सांगितले. एका महाविद्यालयीन मुलीने सांगितले की, माझी लहान बहीण सध्या पोकेमॉनच्या गेमची अ‍ॅडिक्ट झाली आहे. हा गेम खेळताखेळता ती परिसरातील गार्डनमध्ये आणि तेथून उपवन तलाव आणि शेवटी थेट येऊरच्या जंगलात गेली. बराच वेळानंतर तिला आपण कुठे पोहोचलो, याचे भान आले. सुदैवाने तिच्यावर भलतासलता प्रसंग ओढवला नाही. सध्या आम्ही खूप धास्तावलो असून तिच्यावर बारीक लक्ष देऊन आहोत. तिला समजही दिली आहे. मात्र, तिचे हे वेड आणखी वाढले, तर तिचे कौन्सिलिंग करावे लागेल. ही मुलगी ‘देवदयानगर’ येथे राहणारी आहे. आमच्या इमारतीमधील प्रत्येक घरातील मुलाला सध्या पोकेमॉनच्या गेमचे वेड लागले आहे. इमारतीच्या परिसरात, गार्डनमध्ये ही मुले एकत्र येऊन हा गेम खेळताना दिसतात. हा गेम खेळण्याच्या नादात कुठेही निघून जातात, असे अन्य एका तरुणीने सांगितले. माझा लहान भाऊ सायकलवरून जात होता आणि समोरून एक मुलगा भररस्त्यातून हा गेम खेळत येत होता. माझ्या भावाने सायकलचा हॉर्न खूप वेळा वाजवला. मात्र, त्याचे लक्ष नव्हते. मोबाइलमध्ये बघतबघत तो समोरचा मुलगा माझ्या भावाच्या सायकलवर येऊन आदळला. सुदैवाने दोघांना काही झाले नाही, असे नौपाड्यातील तरुणाने सांगितले.

सध्या भारतात अनधिकृत
‘पोकेमॉन गो’ हा गेम भारतात अधिकृतपणे आला नसला तरी त्याचे पायरेटेड व्हर्जन अनेकांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड केले आहे. कॅमेरा आणि जीपीएस फीचरचा वापर करून तुम्ही राहत असलेल्या परिसरात पोकेमॉनला शोधून पकडता असा हा गेम आहे.

या गेमच्या मागे लागाल तर मोबाइल होईल जप्त?
पोकेमॉनच्या शोधात मोबाइलमध्ये पाहत रस्ता ओलांडणाऱ्या किंवा वाहन चालवणाऱ्यांना रोखण्याकरिता त्यांचे मोबाइल जप्त करण्याची कारवाई वाहतूक पोलिसांकडून केली जाण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.
ठाण्यातील १५ ते २५ वयोगटांच्या मुलांमध्ये पोकेमॉन गो या गेमची क्रेझ वाढली आहे. हा गेम खेळत रस्त्याने जाणारी मुले रस्ता ओलांडताना किंवा वाहन चालवताना दिसली तर त्यांचे मोबाइल जप्त करायचे व पालकांना बोलावून त्यांच्या समक्ष तंबी दिल्यावर परत करायचे, असा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतल्याचे सांगण्यात आले.
हॅण्ड्स-फ्रीचा वापर करून गाणी ऐकत रस्त्याने चालणारे किंवा चक्क वाहन चालवणाऱ्यांना अडवून तसे करण्यापासून परावृत्त करताना आतापर्यंत वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागत होती. आता पोकेमॉनच्या शोधात फिरणाऱ्यांना रोखण्याची व अपघात टाळण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांना पार पाडावी लागणार आहे.
वाहन चालवताना मोबाइलवर बोलण्यामुळे अपघात होऊ लागल्याने वाहतूक शाखेने वाहन चालवताना, मोबाइलवर बोलणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. तरीसुद्धा, मोबाइल रिंग वाजल्यावर मोबाइल उचलण्याचा मोह अनेक वाहनचालकांना आवरत नसल्याचे पाहायला मिळते.

हा नवा गेम खेळताना सुदैवाने अजून तरी अपघात घडलेला नाही. मात्र, हा गेम खेळणाऱ्यांचे भान हरपते, हे ऐकून आहे. त्या खेळामुळे वाहतूक शाखेसमोर उभ्या ठाकणाऱ्या आव्हानांचा आम्ही अभ्यास करीत असून लवकरच पावले उचलण्यात येतील. वाहने चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांविरोधात किंवा त्याचा वापर करणाऱ्यांविरोधात वाहतूक शाखेमार्फत कारवाई सुरूच आहे.
- संदीप पालवे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे

Web Title: Thunderbolt Madan by 'Pokémon Go'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.