रत्नागिरी : गौरी-गणेशाचे विसर्जन होते न होते तोच कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली आहे. कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये पाय ठेवायला जागा न उरल्याने सर्वच प्रवाशांनी शयनयानमध्ये घुसखोरी केली, तर राजापूरकरांना कोकणकन्याचे दरवाजेच बंद केल्याने गाडीतील प्रवाशांची तणातणी झाली.कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल बोगींमध्ये पायही ठेवता येणार नाही, एवढी गर्दी झाल्याने प्रवासी शयनयानात घुसले. त्यामुळे प्रवाशांना झोपणे दूरच बसणेही कठीण बनले. राजापूर स्थानकावर कोकण कन्याचे दरवाजेच बंद करण्यात आल्याने स्थानकावरील प्रवाशांनी गाडीचे दरवाजे बडवत संताप व्यक्त केला. रत्नागिरी रेल्वे स्थानकावरही प्रवाशांची जत्रा भरली होती. रात्री १० वाजण्याच्या सुमारास गर्दी एवढी वाढली की, त्यामुळे राज्यराणी एक्सप्रेससाठी प्रवाशांची पळापळ सुरू होती. पहिल्याच गाडीला प्रचंड गर्दी करणाऱ्या प्रवाशांना आवरण्यासाठी उद्घोषणा करण्यात आली. मुंबईकडे जाणाऱ्या सहा रेल्वे गाड्या असून, प्रवाशांनी एकाच गाडीला गर्दी करू नये, असे निवेदन ध्वनिक्षेपकावरून केले जात होते. (प्रतिनिधी)अजून आठवडाभर रेल्वेला गर्दीच!रत्नागिरी जिल्ह्यात ११ दिवसांचे गणपतीही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे अजून आठवडाभर मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांची रेल्वे गाड्यांना रिघ लागणार आहे. प्रवाशांचे प्रमाण लक्षात घेऊन कोकण रेल्वेने काही गाड्यांच्या बोगीज वाढविण्याची मागणीही केली जात आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर जत्रा?वसई, कुर्ला टर्मिनस, शिवाजी टर्मिनस, दादर, बांद्रा या ठिकाणाहून मडगाव, सावंतवाडीपर्यंत जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. कोकणकन्या, राज्यराणी ही वर्षभर प्रवाशांनी भरून वाहात असते. त्यामुळे गणेशोत्सवातही या गाडीला तुफान गर्दी होत आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर सोमवारी सायंकाळपासून राजापूर रोड, आडवली, विलवडे, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळुण व खेड या स्थानकांवर प्रवाशांची जणू जत्रा भरल्याप्रमाणे गर्दी झाली होती.
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा महापूर
By admin | Published: September 22, 2015 9:04 PM