मुंबई : ‘पिंट्याची हंडी फुटली रे...’ असे म्हणत गेला महिनाभर गोविंदा पथकांचा कसून सराव सुरू आहे. मात्र सरावासोबतच या थरांची थरारक झलक दाखविण्याचा चंग यंदा गोविंदा पथकांनी बांधला आहे. यात नामांकित गोविंदा पथकांकडून काही मिनिटांचे ट्रीझर्स करण्याचा ट्रेंड दिसून येतो आहे. माझगावच्या दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने नऊ थरांचा विक्रम रचला. या मंडळाचा सराव, त्याने केलेले विक्रम, खेळाडूंची जिद्द, पथकातील बालगोविंदाच्या चेहऱ्यावरील भाव आणि थर रचतानाचे क्षण प्रतीक चितालिया याने कॅमेऱ्यात टिपले आहेत. ‘द फॉल आॅफ ग्लोरी’ या नावाने सध्या हा ट्रीझर व्हॉट्सअॅप आणि युट्युबवर शेअर होतो आहे. या माध्यमातून दहीहंडीविषयी डॉक्युमेंटरी तयार करून ती आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठविण्याचा प्रतीकचा मानस आहे. मानवी मनोरे रचण्याचा खेळ प्रामुख्याने संतीअगो (चिली), विलाफ्रान्चा (स्पेन) व मुंबई (भारत) येथे खेळला जातो. या विषयावर आधारित हा लघुपटच म्हणता येईल. या व्हिडीओमध्ये उपनगरचा राजा म्हणवणाऱ्या जोगेश्वरीच्या जय जवान पथकाच्या दृश्यांचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)
थरांची थरारक ‘झलक’!
By admin | Published: July 28, 2014 2:09 AM