‘बनावट’ व्हीआयपी पत्राने तिकीट आरक्षित करणाऱ्याला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:32 AM2018-05-24T01:32:33+5:302018-05-24T01:32:33+5:30
देशभरातील रेल्वे कार्यालयातून तिकीट आरक्षण करण्यासाठी आरोपी प्रति तिकिटामागे सुमारे दोन ते अडीच हजार रुपये आकारत होता.
मुंबई : बनावट सरकारी उच्च पदस्थ अधिकाºयांच्या विनंती पत्रकावरून रेल्वे तिकीट आरक्षण करणाºया तरुणाला बेड्या ठोकण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. देवप्रताप चतुर्भुज सिंह (२९) असे या आरोपीचे नाव आहे. देशभरातील रेल्वे कार्यालयातून तिकीट आरक्षण करण्यासाठी आरोपी प्रति तिकिटामागे सुमारे दोन ते अडीच हजार रुपये आकारत होता.
मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या (डीआरएम) कार्यालयाऐवजी, रेल्वेच्या न्यायाधिकरण कार्यालयाच्या फॅक्सवर तिकीट आरक्षण करण्याचे शिफारसपत्र २४ एप्रिल रोजी प्राप्त झाले. राज्याचे निवृत्त अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांचे हे शिफारस पत्र होते. डीआरएम कार्यालयाने बक्षी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे पत्र पाठविले नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी बक्षी यांनी रेल्वे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांच्या आदेशाने सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत, लखनौ येथून आरोपी देवप्रताप सिंहला अटक करण्यात आली. सद्यस्थितीत आरोपीला २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मूळचा उत्तर प्रदेश येथील हुसेनगंज येथे राहणारा देवप्रताप सिंग, गेल्या दोन वर्षांपासून बनावट उच्च पदस्थ सरकारी अधिकाºयांच्या पत्राचा बेकायदेशीर वापर करत होता. यात गृहविभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्या पत्राचादेखील समावेश आहे. १० एप्रिल ते ९ मे या काळात तब्बल ११ पीएनआर तिकीट बनावट पत्रांच्या मदतीने आरक्षित करण्यात आले. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील लोकसभा-राज्यसभा सदस्य, राज्यपालांचे प्रधान सचिव, विधान परिषद सदस्य, लोकआयुक्त, विधानपरिषद सदस्य या अधिकाºयांच्या बनावट पत्रांचा यात समावेश असल्याची माहिती उपायुक्त समाधान पवार यांनी दिली.
देशभरातील रेल्वेचे तिकीट आरक्षण
देशभरातील रेल्वे कार्यालयातून कोणत्याही मेल-एक्स्प्रेसचे तिकीट आरक्षण करून देत असे. यासाठी हंगामानुसार प्रति तिकिटामागे पैसे आकारत होता. सुट्ट्यांच्या कालावधीत एका तिकिटामागे तब्बल १ हजार २०० ते २ हजार ४०० आणि अन्य काळात ८०० ते १ हजार ५०० रुपये घेत असे. या कामात अन्य कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश आहे. याबाबत रेल्वे पोलीस चौकशी करत आहे.
उत्तर प्रदेशातून अटक
रेल्वे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य परिमंडळाचे पोलीस उपआयुक्त समाधान पवार, सहायक पोलीस निरीक्षक रूपाली पोळ, हवालदार धनराज महाजन, हवालदार साजिद शेख आणि अन्य ११ जणाच्या पथकाने ही कारवाई केली. उत्तर प्रदेश येथून देवप्रतापला अटक करण्यात आली.
असा वापरत होता ‘व्हीआयपी कोटा’
बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या देवप्रताप इंटरनेटच्या माध्यमाने देशभरातील उच्च पदस्थ सरकारी अधिकाºयांचे सही असलेले कार्यालयीन पत्र डाउनलोड करत असे. या पत्रावर सही आणि मथळा जशाचा तसा कट पेस्ट करून अन्य कागदावर घेत होता. संबंधित तिकिटाचा ‘पीएनआर क्रमांक’ टाकून संबंधित डीआरएम कार्यालयाच्या फॅक्सवर शिफारस पत्र पाठवत असे. त्याचबरोबर, तंत्रज्ञानाच्या मदतीने संबंधित उच्च पदस्थ कार्यालयाचा फॅक्स रेल्वे कार्यालयात दिसेल, याबाबत तो दक्षता घेत होता.