मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासामध्ये तिकीट तपासनीस कधी येऊ शकतो, याचे प्रत्येक मुंबईकरांचे काही आडाखे असतात, पण अशा सर्वांचेच अंदाज चुकावेत अशी एक घटना भांडुप स्थानकात नुकतीच घडली. कल्याणच्या दिशेने जाणारी एक लोकल रात्री उशिरा जेव्हा भांडुप स्थानकात आली, त्यावेळी त्या गाडीच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात अचानक खूप गर्दी चढली. एवढी गर्दी कशी चढली, यात लोकांचे प्रथम श्रेणीचे तिकीट असेल का, असे प्रश्न मनात आल्याने त्याच प्लॅटफॉर्मवर ड्युटीला असलेली ही महिला तिकीट तपासनीस त्या भरगच्च डब्यात चढली.
डब्यात शिरकाव केल्यानंतर या महिला तिकीट तपासनीसने अत्यंत आदबीने लोकांकडे तिकीट व पास तपासण्यासाठी मागितले. ज्यांचे तिकीट पास होते त्यांना अतिशय नम्रपणे थँक यू म्हणत त्या पुढच्या लोकांची तपासणी करत होत्या. विशेष म्हणजे, ज्या प्रवाशांचे पास संपत आले होते त्यांना अतिशय आदबीने तुमच्या पासची मुदत संपत आली आहे. तरी तो लवकर नवीन काढावा, अशी सूचना करत होत्या. या प्रवासात केवळ एकच प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळले. त्याच्यावर अर्थातच यथोचित कारवाई झाली. कुणीतरी त्यांचा व्हिडीओ काढत तो शेअर केला. तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.