एसटीच्या शिवशाही स्लीपर बसच्या तिकीट दरात कपात : किमान २३० ते ५०५ रुपये कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 06:14 AM2019-02-09T06:14:35+5:302019-02-09T06:15:03+5:30
एसटीच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान (एसी स्लीपर) बसच्या तिकिटाच्या दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.
मुंबई - एसटीच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान (एसी स्लीपर) बसच्या तिकिटाच्या दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर कमी झालेले नवीन दर १३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येतील. परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शुक्रवारी या दरकपातीची घोषणा केली. यामुळे भाडे कमीतकमी २३० ते ५०५ रुपये एवढे कमी होईल.
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, खासगी वाहतुकीची स्पर्धा, तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा, म्हणून ही दरकपात केल्याचे रावते यांनी सांगितले. ते म्हणाले की, एस.टी महामंडळाने शिवशाहीच्या तिकिटांच्या दरात कपात करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविला होता. सध्या एस.टी महामंडळातर्फे राज्यातील विविध ४२ मार्गांवर वातानुकूलित शिवशाही बस धावत आहेत. जास्तीतजास्त प्रवासी वाढविण्याचे उद्दिष्ट एसटी महामंडळाने ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.
वातानुकूलित शिवशाही शयनयान बसमध्ये ज्येष्ठांना तिकीट दरात ३० टक्के सवलत यापूर्वीच दिली आहे. तिकिटांच्या दरातील कपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांसह ज्येष्ठांनाही होईल, अशी अपेक्षा एसटी महामंडळाने व्यक्त केली.
महत्त्वाच्या मार्गांवरील
जुने व नवीन दर (रुपये)
मार्ग जुने दर नवीन दर
मुंबई ते औरंगाबाद १,०८५ ८१०
मुंबई ते रत्नागिरी ९५५ ७१५
मुंबई ते कोल्हापूर १,०५० ७८५
मुंबई ते पंढरपूर १,०२० ७६०
मुंबई ते परळी १,३४० १,०००