१६४ विमाने वापराविना म्हणून वाढले तिकीट दर; दिल्लीत ६४, तर मुंबईत २४ विमाने उभी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 10:23 AM2023-12-28T10:23:41+5:302023-12-28T10:24:32+5:30
सध्या बंद पडलेल्या विमानांपैकी सर्वाधिक विमाने ही दिल्ली विमानतळावर उभी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या मे महिन्यामध्ये गो-फर्स्ट कंपनी बंद पडल्यानंतर एका झटक्यात कंपनीची ५६ विमाने जमिनीवर स्थिरावली. त्या पाठोपाठ आगामी एक ते दीड महिन्यात इंडिगोचीदेखील ८० विमाने तांत्रिक कारणांमुळे जमिनीवरच स्थिरावण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, केवळ एवढीच विमाने बंद पडली नसून हा एकत्रित आकडा १६४ वर गेल्याची माहिती आहे. देशात असलेल्या एकूण ७५० विमानांपैकी १६४ विमाने बंद पडल्यामुळे अन्य विमानांवर याचा ताण आला असून, याची परिणती विमान प्रवासाचे दर वाढण्यातदेखील झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सध्या बंद पडलेल्या विमानांपैकी सर्वाधिक विमाने ही दिल्ली विमानतळावर उभी असून, त्यांची संख्या ६४ इतकी आहे, तर त्यापाठोपाठ बंगळुरू विमानतळावर २७ विमाने उभी आहेत. मुंबई विमानतळावर देखील २४ विमाने वापराविना पडून आहेत. आजच्या घडीला मुंबई विमानतळावर गो-फर्स्टची ९, जेट एअरवेजची ६, एअर इंडियाची ४, स्पाईसजेटचे १, तर जनरल एव्हिएशन कंपनीची ४ विमाने ठप्प झाल्याची माहिती आहे. मुंबईखेरीज अहमदाबाद, भुवनेश्वर, कोचीन, गोवा-मोपा, हैदराबाद, जयपूर, कोलकात्ता, नागपूर, रायपूर येथेदेखील काही विमाने धूळ खात उभी आहेत. या विमानांच्या बंद पडण्याचा विमान कंपन्यांना दुहेरी फटका बसत आहे.