Join us  

एलिव्हेटेड स्टॅण्डवरच तिकीट विंडो

By admin | Published: June 18, 2014 3:10 AM

येथील रामनगर भागात बांधण्यात येणाऱ्या एलिव्हेटेड आॅटो स्टॅण्डच्या पुलावरच दोन तिकीट खिडक्यांचा प्रस्ताव मध्य रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे ठेवला होता

अनिकेत घमंडी, डोंबिवलीयेथील रामनगर भागात बांधण्यात येणाऱ्या एलिव्हेटेड आॅटो स्टॅण्डच्या पुलावरच दोन तिकीट खिडक्यांचा प्रस्ताव मध्य रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे ठेवला होता. त्यानुसार महापालिकेच्या अभियंत्यांसह मंदार हळबेंनी या प्रकल्पाचे रचनाकार राजीव तायशेटे यांना मूळ आराखड्यात बदल सुचवले. त्यांनीही नुकतेच त्यात बदल केले असून आता एलिव्हेटेड तिकीट घराचीही सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.याबाबत हळबे यांनी सांगितले की, पुलावर आल्यावर केवळ तिकिटासाठी खाली जाण्याचा त्रास प्रवाशांना नको. त्यांना तातडीने ही सुविधा मिळाली की ते शक्य तेवढ्या जलद मार्गे प्रवासाला लागतील. जेणेकरून खालच्या तिकीटघरावर पडणारा ताण कमी होईल, असा उद्देश आहे. तसेच याचठिकाणी सहज आणि सोयीची जागा मिळाल्यास प्रवाशांसाठी आॅलटाइम तिकीट व्हेडिंग मशिनही बसवण्यात येतील. जेणेकरून तिकिटाची सुविधा अधिक जलद व सोयीची होण्यास मदत होईल. वरच्या ठिकाणी दोन तिकीट खिडक्यांसाठी जागाही आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहे.त्या जागेवर स्वच्छतागृह बांधण्याची रोटरीची तयारी, पण..सध्या ज्या जागेवर राजाजी पथचा रिक्षा स्टॅण्ड आहे तो एलिव्हेटेड आॅटो स्टॅण्ड आल्यावर नसेल. परिणामी जी जागा मिळेल त्याठिकाणी रेल्वेच्या भिंतीलगत स्वच्छतागृह बांधण्याची रोटरी क्लबची तयारी असल्याचे हळबे यांनी स्पष्ट केले. मात्र आता त्यास रेल्वे प्रशासन आडमुठे धोरण पत्करत असून ती जबाबदारी महापालिकेची असून त्यामध्ये रेल्वे काहीही लक्ष घालणार नसल्याचे हळबेंना रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले. असे असले तरीही जेथे रेल्वेचा संबंध येत नाही अशा ठिकाणी मात्र प्रवाशांना सोयीस्कर असेल अशा जागेवर पालिकेने स्वच्छतागृह बांधावे, असेही ते म्हणाले.