मुंबई - भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी १११ उमेदवारांची ५ वी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील ३ मतदारसंघातील उमेदवार घोषित केले असून अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. रामायणात प्रभू श्रीराम यांची भूमिका केलेल्या अरुण गोविल यांनाही भाजपाने उमेदवारी दिली आहे. अभिनेत्री कंगना रणौतलाही हिमाचल प्रदेशमधून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. तर, अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशच्या मेरठ येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसचे माजी खासदार आणि नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या उद्योजक नवीन जिंदाल यांनाही हरयाणातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. विशेष म्हणजे भाजपा प्रवेशानंतर अर्ध्या तासातच त्यांच्या उमेदवारीची घोषणा भाजपाकडून करण्यात आली. नवीन जिंदाल यांनी प्रवेश केल्याची माहिती भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली. त्यानंतर, अर्ध्या तासातच भाजपाच्या १११ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये, हरयाणातील एका जागेसाठी कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून नवीन जिंदाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, नवीन जिंदाल यांनी काही तासांपूर्वीच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनात भाजपात प्रवेश करत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
रामायण मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अरुण गोविल यांना भाजपाने उत्तर प्रदेशच्या मेरठ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. जय श्रीरामचा नारा देणाऱ्या भाजपाने टिव्हीवरील प्रभू श्रीराम यंदा लोकसभेच्या मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे, आगामी प्रचारात भाजपाकडून अरुण गोविल यांचा कसा उपयोग करुन घेतला जाईल, हे पाहावे लागेल. विशेष म्हणजे नुकतेच आर्टीकल ३७० सिनेमात अरुण गोविल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील ३ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, सोलापुरातून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भंडारा-गोंदियातून सुनिल बाबूराव मेंढे आणि गडचिरोलीतून अशोक महादेवराव नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघातून भाजपाने विद्यमान खासदारांना तिकीट दिलं आहे. मात्र, सोलापुरातून जय सिद्धेश्वर महाराज यांचं तिकीट कापलं आहे. त्यामुळे, माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी तरुण लढत पाहायला मिळणार आहे.