- मनोहर कुंभेजकरमुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्यासाठी भाजपात आत्तापासूनच जोरदार स्पर्धा सुरू झाली असून पश्चिम उपनगरातील भाजपच्या विद्यमान महिला आमदारांची तिकीट कापण्याचे मनसुबे रचले जात असून कमळच कमळाला कापत असल्याची चर्चा रंगली आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात ३३ टक्के महिला आमदारांना भाजप उमेदवारी देईल असे सूतोवाच केले आहे. मात्र विद्यमान महिला आमदारांची तिकीटे कापण्यासाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.गोरेगाव विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार व महिला व बालकल्याण राज्यमंत्री असलेल्या विद्या ठाकूर यांच्या जागी माजी उपमहापौर दिलीप पटेल व माजी नगरसेवक समीर देसाई हे प्रयत्नशील असल्याचे समजते.तर, दहिसर विधानसभा मतदार संघाच्या भाजपाच्या विद्यमान आमदार मनीषा चौधरी यांच्या मतदारसंघातून भाजपाचे विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर इच्छुक आहेत. त्याचवेळी हा मतदार संघ शिवसेनेला मिळावा यासाठी शिवसेना प्रयत्नशील असून शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर येथून इच्छुक असल्याचे समजते. २०१४च्या निवडणुकीत वसोर्वा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विद्यमान आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी काँग्रेसचे आमदार बलदेव खोसा यांचा सुमारे २६००० मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघात भाजपा युवा मोचार्चे मुंबई अध्यक्ष मोहित भारतीय हे प्रयत्नशील आहेत. भाजपा प्रदेश सचिव संजय पांडे व भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रघुनाथ कुलकर्णी हे सुद्धा येथून इच्छुक असल्याचे समजते.
महिला आमदारांच्या तिकिटावरून रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 3:18 AM