सुशांत मोरे, मुंबईबाहेरगावी जाण्यासाठी रेल्वे हा प्रवासासाठी एक सुलभ पर्याय. मात्र मेल-एक्स्प्रेसचे तिकीट काढण्यासाठी होणारी धडपड, तिकिटांची भलीमोठी वेटिंग लिस्ट. यामुळे कन्फर्म तिकीट मिळविण्यासाठी अधिकृत आणि अनधिकृत दलालांना जादा पैसे देऊन तिकीट मिळविण्याचा खटाटोप केला जातो. रेल्वे तिकीट मिळविण्यासाठी अधिक पैसे मोजून काही प्रवाशांनी पत्करलेल्या या मार्गाचा फटका अन्य प्रवाशांनाही बसतो आणि त्यांना सामोरे जावे लागते ते केवळ वेटिंग लिस्टला. असे रेल्वेचे तिकीट मिळवून देण्यासाठी दलाल प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात. यात काही प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळते तर काहींची दलालांकडून फसवणूक केली जाते. दलालांकडून होत असलेला रेल्वे तिकिटांचा हा काळाबाजार सध्या तेजीत असून, रेल्वे सुरक्षा दलाकडून त्याला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.1 लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिटांची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या एका टोळीला मध्य रेल्वे सुरक्षा दलाने वाशीत अटक केली. वाशी येथे टाकलेल्या वेगवेगळ्या छाप्यात तीन आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून एकूण १११ तिकिटे हस्तगत करण्यात आली. यातील ६0 तिकीटे विशिष्ट सॉफ्टवेअर वापरुन काढण्यात आली होती. त्यांची किंमत २ लाख ११ हजार ५८0 रुपये एवढी होती.पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ आणि दलालविरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनंतर खेरवाडी येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात गुप्ता टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकासोबतच नऊ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल १0 लाख १३ हजार ५९३ रुपये किंमतीची ३३७ तिकिटे हस्तगत करण्यात आली. त्याचबरोबर दहा मोबाईल, १५ कॉम्प्युटर आणि साडेसात हजार रोख रक्कमही सापडली. महत्वाची बाब म्हणजे ३३७ तिकिटांपैकी १00 तिकिटे ही तात्काळ कोट्यातील होती. ३00 बनावट पर्सनल आयडीमधून ही तिकिटे काढतानाच एका पर्सनल आयडीतून महिन्याला दहा तिकिटे काढण्यात येत होती.दलालांना आळा घालण्यासाठी आमच्याकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे २0१५ मध्ये मोठी कारवाई झाल्याचे दिसते. मुळातच तिकिटे काढताना अशी काही बंधने असायला हवीत की जेणेकरुन दलाल तिकिटे काढू शकणार नाहीत. - आनंद झा, पश्चिम रेल्वे सुरक्षा दल- वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तरेल्वे तिकिटांची दलाली मोठ्या प्रमाणात जरी होत असली तरी त्याला आळा घालण्यात आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी आमची यंत्रणा कार्यरत आहे. - सचिन भालोदे, मध्य रेल्वे सुरक्षा दल- वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तई-तिकिटांमध्ये घोटाळा विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापरअधिकृत दलाल आयआरसीटीने दिलेल्या एका विशेष आयडीवरून त्यांना आखून दिलेल्या आरक्षण क्षमतेहून तिकिटे काढतात आणि त्याची विक्री करतात. तसेच त्यांच्याकडूनही विशिष्ट सॉफ्टवेअर वापरून बनावट ओळखपत्राच्या साहाय्याने तिकीटविक्री केली जाते.सध्या अनधिकृतपणे तिकीट आरक्षण करणारे सॉफ्टवेअर बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अधिकृत आणि अनधिकृत दलाल त्याचा वापर करतात. सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या दलालांकडूनही महिन्याला २,५00 रुपयांना भाड्यावर ते दिले जाते.पीआरएसवरील तिकीट खिडक्या सुरू होताच या सॉफ्टवेअरमार्फत शिरकाव करून काही सेकंदांतच तिकिटे आरक्षित केली जातात. अधिकृत दलालांकडूनही अनधिकृतपणे तिकिटांची विक्री केली जाते. या तिकिटांच्या गैरप्रकारात आतापर्यंत अनेक अधिकृत दलालही पकडण्यात आले आहेत. सॉफ्टवेअरमधून तिकिटांची विक्री करताना तर प्रत्येक तिकिटामागे १,२00 रुपये अधिकचे शुल्क आकारले जाते.बनावट पर्सनल आयडीमधून ही तिकिटे काढण्यात येतात.
तिकिटांचा काळाबाजार तेजीत
By admin | Published: January 18, 2016 2:50 AM