मुंबई : रेल्वे स्थानकांच्या काउंटरवर प्रवाशांना तिकीट आरक्षण शुक्रवारपासून करता येणार आहे. रेल्वे परिपत्रकानुसार, प्रवासी आरक्षित प्रवासासाठी स्थानक, रेल्वे परिसरातील काउंटरवरुन तिकिटे आरक्षित करू शकतील. तिकिटांचे आरक्षण करताना सामाजिक अंतर राखण्याची जबाबदारी प्रत्येक रेल्वे विभागाची असणार आहे.
रेल्वे मंत्री पीयूष गोयल म्हणाले होते की, लवकरच रेल्वे स्टेशनच्या काऊंटरमधून सामान्य लोकांना तिकिटे मिळतील. यासाठी रेल्वे विभागाचे पथक सर्व सुरक्षा व्यवस्थांचा आढावा घेत आहे. सर्व व्यवस्था केल्यानंतर सर्वसामान्यांसाठी तिकिट काउंटर उघडले जातील. रेल्वेमंत्र्यांनी अशी आशा व्यक्त केली की येत्या १-२ दिवसात काउंटरवरून तिकिट खरेदीची सेवा पूर्ववत होऊ शकेल. त्याप्रमाणे शुक्रवारपासून तिकीट काउंटर सुरू होणार आहेत.
कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन लागू आहे. आता हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात आहे. संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी रेल्वेने स्थानकांवरील काउंटरवर तिकिट आरक्षणाची सुविधा देखील बंद केली होती. दरम्यान, आता विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. या ट्रेनचं तिकिट ऑनलाईन बुक करावं लागत होतं. पण आता रेल्वे स्टेशन काऊंटरमधूनही तिकिटे आरक्षित करता येतील असा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.