मुंबई : प्रवाशांची तिकिटांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर एटीव्हीएम मशिन बसविण्यात आली. मात्र एटीव्हीएममध्ये असणाऱ्या अनेक पर्यायांमुळे एका प्रवाशाला एका दिशेच्या प्रवासाचेही तिकीट मिळविताना बराच वेळ लागतो. प्रवाशाला होणारा मनस्ताप लक्षात घेता रेल्वेच्या क्रिस संस्थेकडून एटीव्हीएममध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या बदलानुसार ‘फास्ट बुकिंग’चा पर्याय देत अवघ्या दोन क्लिकवरच तिकीट उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती रेल्वेच्या क्रिस (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम) संस्थेकडून देण्यात आली. मुंबईतील क्रिसचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले की, एका प्रवाशाला एका दिशेच्या प्रवासाचे तिकीट मिळेल आणि हे तिकीटसुध्दा सेकंड क्लास प्रवासाचे असेल. यामुळे प्रवाशाचा वेळ वाचेल, असा दावा त्यांनी केला. येत्या १५ दिवसांत ही सेवा पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील एटीव्हीएम मशिनमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे बोभाटे म्हणाले. एटीव्हीएम मशिनच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल केले जात असून, त्याची टेस्टिंगही करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)तिकीट कसे मिळेल ?-फास्ट बुकिंगचा पर्याय मशिनमध्ये देण्यात येईल. -त्यावर क्लिक करताच २0 स्थानकांची यादी समोर येईल. -त्यामध्ये प्रवास करणाऱ्या एका स्थानकावर क्लिक करताच तत्काळ तिकीट उपलब्ध होईल. फर्स्ट क्लासपेक्षा सेकंड क्लासचे प्रवासी जास्त तिकीट काढत आहेत. त्यातच एकेरी प्रवास त्यांच्याकडूनच अधिक होत आहे. त्यामुळे प्रथम सेकंड क्लास प्रवासासाठीच हा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. एटीव्हीएममधील फास्ट बुकिंगच्या पर्यायामध्ये २0 स्थानकांची यादी असेल. प्रत्येक स्थानकांवरील एटीव्हीएम मशिनमधील फास्ट बुकिंगमध्ये २0 स्थानके ही वेगवेगळी असतील. नियमित एकेरी प्रवासासाठी कोणत्या स्थानकांसाठी प्रवासी तिकीट काढतात याची माहिती घेण्यात आली आहे. त्यामुळेच वेगवेगळी स्थानके देण्याचा निर्णय झालेला आहे.प्रवाशाला प्रवास करण्याचे स्थानक या फास्ट बुकिंगमध्ये न सापडल्यास तो प्रवासी एटीव्हीएममधील जुन्या पर्यायांव्दारे स्थानक शोधून तिकीटही काढू शकतो. एटीव्हीएमधील सध्याच्या पयार्यात कोणताही बदल न करता फक्त हा नवीन पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची माहिती, बोभाटे यांनी दिली. त्यामुळे तिकीट जलद मिळण्यास सोपे जाणार आहे.
एटीव्हीएममधून दोन क्लिकवर मिळणार तिकीट
By admin | Published: May 05, 2016 2:27 AM