ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - अवकाशातील गुरुत्वीय लहरीच्या (ग्रॅव्हिटेशनल वेव्हज) शोधामध्ये भारतातील टाटा मूलभूत अनुसंधान संस्था (टीआयएफआर) आणि बंगळुरुच्या आयसीटीएस या दोन संस्थांनी महत्वाची भूमिका बजावली. टीआयएफआरच्या नेतृत्वाखाली भारतीय संशोधक या संशोधनात सहभागी झाले होते.
मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यातच गुरुत्वीय लहरी अस्तित्वात असल्याचे ठोस पुरावे मिळाले होते. टीआयएफआर आणि आयसीटीएसच्या वैज्ञानिकांनी कृष्णविवर आणि गुरुत्वीय लहरीच्या ऊर्जेच्या संशोधनात महत्वाचे योगदान दिले.
हा शोध जाहीर झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संशोधनात सहभागी असलेल्या भारतीय वैज्ञानिकांचेही अभिनंदन केले होते. महत्त्वपूर्ण संशोधनात भारतीयांचाही सहभाग असल्याने मला त्यांचा अभिमान वाटतो. हे एक आव्हानात्मक संशोधन आहे. गुरुत्वीय लहरींचा ऐतिहासिक शोध लागल्याने आपले विश्व समजून घेण्यात एक नवीन खिडकी खुली झाली आहे.
या मोहिमेत आणखी भारतीय शास्त्रज्ञांचा सहभाग वाढेल, अशी मला अपेक्षा आहे असे मोदी म्हणाले होते. डॉ. पी. अजित यांनी आयसीटीएसच्या वैज्ञानिकाचे नेतृत्व केले. टीआयएफआरमध्ये दोन ग्रुप होते. त्यापैकी एका गटाचे प्राध्यापक ए.गोपाकुमार आणि सी.एस.उन्नीकृष्णन यांनी नेतृत्व केले. प्राध्यापक नाबा के. मंडल लिगो गटाच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य होते.