'टायगर जिंदा है' मुळे थिएटर न मिळणा-या 'देवा' चित्रपटासाठी अक्षय कुमार मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 03:47 PM2017-12-19T15:47:11+5:302017-12-19T16:21:47+5:30
येत्या शुक्रवारी 'देवा' आणि 'गच्ची' या दोन मराठी चित्रपटांसोबत सलमान खान आणि कतरिनाचा 'टायगर जिंदा है' चित्रपटही रिलीज होत आहे.
मुंबई - येत्या शुक्रवारी 'देवा' आणि 'गच्ची' हे दोन मराठी चित्रपट रिलीज होत आहे. यासोबतच सलमान खान आणि कतरिनाचा 'टायगर जिंदा है' चित्रपटही रिलीज होत आहे. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर भिडणार आहेत. मात्र 'टायगर जिंदा है' चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाहीयेत. यानंतर 'देवा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे धाव घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करत मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. बॉलिवूड विरुद्ध मराठी असे दोन गट पडले असताना खिलाडी अक्षय कुमारने लोकांना 'देवा' चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे.
अक्षय कुमार आणि सलमान खान खूप चांगले मित्र आहेत. मात्र अक्षयने ट्विट करत अंकुश चौधरीचा 'देवा' हा मराठी चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे अक्षय कुमार मराठीत बोलला आहे. यावेळी त्याने प्रमोद फिल्म्स हे इंडस्ट्रीत आपले गॉडफादर असल्याचं सांगितलं आहे.
अक्षय व्हिडीओत सांगत आहे की, 'देव तारी त्याला कोण मारी.. प्रमोद फिल्म्स आणि देवा सिनेमाच्या पूर्ण टीमला माझ्या खूपखूप शुभेच्छा. पाहायला विसरु नका, देवा - एक अतरंगी.. तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र'.
This is a very special shoutout for @pramodfilmsnew, my Godfather in the industry...don't forget to catch their film Deva - Ek Atrangi releasing on Dec 22 at a theatre near you 🙏🏻 @devathefilmpic.twitter.com/CveKmdNnoU
— Akshay Kumar (@akshaykumar) December 19, 2017
देवा चित्रपटाला चित्रपटगृहच मिळत नसल्याचं समोर आलं आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना चित्रपटगृह तसंच प्राइम टाइम मिळत नसल्याचा मुद्दा समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला असून “देवा” चित्रपटाला आपल्या चित्रपटगृहात प्राईम टाईममध्ये खेळ द्या अशी विनंती केली आहे. सोबतच तुटेल एवढे ताणू नका असा इशाराही दिला आहे.