मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मोदी-शहा हटाव’ची हाक देत सभांचा सपाटा लावला आहे. त्यांच्या या सभांमुळे मुंबईतील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. २००९ला मनसे उमेदवारांनी लाखांनी मते खेचल्याने, मुंबईतील सहाही जागांवर युतीचा सुफडा साफ झाला होता. यंदा मनसेचे उमेदवार रिंगणात नसले, तरी राज यांना मानणारा वर्ग मतदानाच्या दिवशी विरोधात गेल्यास काय करायचे, याची काळजी युतीच्या उमेदवारांना भेडसावत आहे.राज यांच्या सभेमुळे दादर, माहिम पट्ट्यातील हक्काचा मतदार विरोधात जाऊ नये, यासाठी शिवसेना कामाला लागली आहे. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवाराचे भवितव्य बहुतांशी दादरकरांच्या मतदानावर असते. त्यामुळे इथे चांगल्या प्रमाणात मतदान होईल आणि मतदार युतीसोबतच राहील, यासाठी राहुल शेवाळे यांची मोर्चेबांधणी सुरू आहे, तर काँग्रेसेचे एकनाथ गायकवाड यांच्यासाठी मनसेमुळे झालेली फूट ही बोनसच ठरणार आहे. त्यामुळे जितके मनसैनिक सक्रिय होतील, तितके चांगले, असे त्यांचे धोरण आहे. मात्र, दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात गायकवाड दादर पट्ट्यात फिरकलेसुद्धा नव्हते, याचा विसर मतदारांना पडला नाही. मोदींना विरोध म्हणून न भेटणारा खासदार निवडून द्यायचा का, असा मुद्दा शिवसैनिक मांडत आहेत़मनसेने लढविलेल्या इतर निवडणुकांचे काय झाले?२००९मध्ये मनसे लोकसभा निवडणुकीत उतरली. मनसेच्या श्वेता परूळेकरांना १ लाख ८ हजार ३४१ मते मिळाली. त्यांच्या मतांची टक्केवारी १८.१ होती. या फुटीमुळे शिवसेना उमेदवार पाऊण टक्के मतांनी पराभूत झाला.२०१४च्या निवडणुकीत मनसेची मते २५ हजारांनी घटली. आदित्य शिरोडकरांसारखा तगडा उमेदवार देऊनही झालेली ही घट मनसेसाठी धक्का होती. नवमतदारांनी मोदींसाठी शिवसेनेला पसंती दिली.त्यानंतर, ६ महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी एकाही जागेवर मनसेला विजय मिळाला नाही. माहिम वगळता उर्वरित सर्वच ठिकाणी अडीच टक्केही मते मिळाली नाहीत.
दक्षिण मध्य मुंबईत इंजिनाच्या शिट्टीने वाढली वाघाची धडधड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:20 AM