लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असताना, मुंबईपोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहराहसह सागरी किनाऱ्यावरील सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. थर्टीफर्स्ट नाईटला हॉटेल्स, पब, बार, वाईन शॉप, रेस्टॉरंट पोलिसांच्या परवानगीने पहाटे ५ वाजेपर्यंत सशर्त सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिल्याने मुंबईकरांना मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत करता येणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील हॉटेल्स, पब, मॉल्स आणि चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता, सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिस दलातील तब्बल ७ अप्पर आयुक्त, २५ उपायुक्त यांच्यासह १, ५०० अधिकारी व १० हजार पोलिस अंमलदार तैनात राहणार आहेत. त्यांच्या दिमतीला राज्य राखीव बलाच्या ४६ प्लाटून, आरसीपीची ३ पथके आणि क्यूआरटीची १५ पथके तैनात केली आहेत. थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनचा फायदा घेत महिलांची छेडछाड करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस साध्या वेशात गस्त घालणार आहेत.
शहरात जागोजागी नाकाबंदी
थर्टीफर्स्टच्या रात्रीच्या जल्लोषासाठी होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष खबरदारी घेत शहरातील पाचही प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहने, संशयित वस्तू आणि व्यक्तींची कसून तपासणी करण्यात येत आहे. तसेच पोलिसांनी हॉटेल्स, लॉजचीही तपासणी सुरू केली आहे.
ड्रग्ज तस्करीवर करडी नजर
शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने कंबर कसली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकांनी शहरातील ड्रग्ज विक्रेत्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली असून, हॉटेल्स, पब, नाईट क्लब, लाऊंज, तसेच फ्लॅट, बंगलो, रिसॉर्ट पार्ट्यांवरही लक्ष ठेवले जाणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"