नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 03:58 AM2019-12-31T03:58:51+5:302019-12-31T04:00:08+5:30
न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी मंगळवारी शहरात विविध ठिकाणी जमणाऱ्या गर्दीचा अंदाज घेत मुंबई पोलिसांनी दहशतवादी हल्ला, धार्मिक किंवा महिला-बालकांविरोधी गुन्हे घडू नयेत यासाठी खबरदारी घेतली आहे.
मुंबई : न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी मंगळवारी शहरात विविध ठिकाणी जमणाऱ्या गर्दीचा अंदाज घेत मुंबई पोलिसांनी दहशतवादी हल्ला, धार्मिक किंवा महिला-बालकांविरोधी गुन्हे घडू नयेत यासाठी खबरदारी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट बंदोबस्त, विशेष पथकांद्वारे तपासणी तसेच हॉटेल, लॉज, गॅरेजची झाडाझडती, नाकाबंदी, कोम्बिंग आॅपरेशन हाती घेत पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.
दरवर्षी थर्टीफर्स्टच्या रात्री गेटवे, मरिन ड्राइव्हसह अन्य चौपाट्यांवर नववर्ष स्वागतासाठी नागरिक गर्दी करतात. त्याशिवाय शहरातील पब, नाइट क्लब, लॉज, बार येथेही गर्दी उसळते. नववर्षाचे स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीसह दारू किंवा अमली पदार्थांच्या नशेत केले जाते.
अशा वेळी गर्दीची संधी साधून भुरट्या चोरांपासून महिला-बालकांविरोधी गुन्हे करणारे गुन्हेगार सक्रिय होतात. त्यामुळे त्या त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त असेलच पण त्यासोबत सशस्त्र दल, दंगलविरोधी पथक, राज्य रखीव पोलीस बल, जलद प्रतिसाद पथक, विशेष शाखा, गुन्हे शाखा आदींचाही बंदोबस्त शहरात असेल, असे पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितले.
गर्दीच्या ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर
गर्दी होणाºया प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जाईल. चौपाट्या, तलाव या ठिकाणांसह महापुरुषांचे पुतळे, धार्मिक स्थळांभोवती गस्त वाढवली जाईल. किनारी भागात बोटींच्या साहाय्याने सतर्क गस्त घातली जाईल. साध्या वेशातील पोलीस पथके गर्दीत मिसळून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतील. तसेच महिला-बालकांविरोधी गुन्हे घडू नयेत यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली. याशिवाय प्रमुख मार्गांवर विशेष नाकाबंदी केली जाईल. शहरातील सर्व हॉटेल्स, लॉज, गॅरेज आदी ठिकाणांची झाडाझडती सुरू असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींची धरपकड सुरू आहे, असेही अशोक यांनी स्पष्ट केले.