भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त
अतिरिक्त कुमक तैनात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात मंगळवारी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदनिमित्त राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून मुंबईसह सर्व प्रमुख शहरांतील मुख्य ठिकाणे व महामार्गावर सोमवारी रात्रीपासून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी राज्य राखीव दलाच्या जवानांना पाचारण केले आहे.
मुंबई शहरात ६०० अतिरिक्त पोलीस व एसआरपीएफच्या ९ तुकड्या मागविण्यात आल्या आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला राज्यातील भाजप वगळता सत्ताधारी महाविकास आघाडीसह सर्व राजकीय पक्ष, संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे या कालावधीत आंदोलकांकडून कोणतेही हिंसक कृत्य घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, सार्वजनिक मालमतेचे नुकसान होऊ नये, बंद शांततेत पार पाडावा, यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
* मुंबईतही ‘भारत बंद’साठी फाैजफाटा तैनात
‘भारत बंद’साठी मुंबईत सकाळपासून गस्त सुरू राहणार आहे. ६०० पोलीस अंमलदारांसह एसआरपीएफच्या ९ तुकड्या तैनात असतील, तसेच ५ हजार सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस सर्व हालचालींवर लक्ष ठेवतील. आस्थापना जबरदस्तीने बंद करण्यास लावू नये, असे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी सांगितले.
.....
.........................