प्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करा; मागणीसाठी शेकडो प्राणीप्रेमींचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 03:08 PM2019-09-15T15:08:08+5:302019-09-15T15:12:44+5:30

नागरी हक्कांसाठी जागरूक असलेल्या मुंबईकरांनी रविवारी सकाळी प्राण्यांच्या हक्कांसाठी अनोखं आंदोलन केलं.

Tighten the law on animal cruelty; Hundreds of animal lovers protest for demand | प्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करा; मागणीसाठी शेकडो प्राणीप्रेमींचं आंदोलन

प्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करा; मागणीसाठी शेकडो प्राणीप्रेमींचं आंदोलन

Next

मुंबई: नागरी हक्कांसाठी जागरूक असलेल्या मुंबईकरांनी रविवारी सकाळी प्राण्यांच्या हक्कांसाठी अनोखं आंदोलन केलं. वर्सोव्याच्या यारी रोडवरील महापालिका उद्यानात ‘आज की आवाज’ या सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने आयोजित आगळ्यावेगळ्या आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल 150हून अधिक प्राणीप्रेमी तसंच जागरूक नागरिकांनी एकमुखाने 'प्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायदा' अधिक कठोर करण्यात यावा ही मागणी केली.

मालाड येथील एका कसायाने एका कुत्रीला ठार मारून तिच्या 3 आठवड्यांच्या सहा पिल्लांना अनाथ केल्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “गेल्या काही वर्षांत प्राण्यांना त्रास देण्याच्या, विशेषत: भटक्या कुत्र्यांच्या  हत्या करण्याच्या घटना मुंबईत सातत्याने वाढत आहेत. मालाडसारख्या माणुसकीला काळिमा फासणा-या घटना भविष्यात रोखायच्या असतील तर 'प्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायदा' कठोर करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही” असं मत “प्राण्यांनाही भावना असतात” या आंदोलनाचे आयोजक आणि ‘आज की आवाज’ या संस्थेचे अध्यक्ष अजय कौल यांनी व्यक्त केलं.

तसेच प्राण्यांची हत्या करून जर 20, 50 किंवा 100 रुपये इतका अत्यल्प दंड भरावा लागणार असेल, तर असा पोकळ कायदा प्राणी हत्या करण्यापासून एखाद्याला कसा काय रोखू शकेल? प्राण्यांविरोधातील क्रूरता, हिंसाचार रोखायचा असेल तर सरकारने या कायद्याअंतर्गतची शिक्षा कठोरात कठोर करावी, हीच सर्व प्राणीप्रेमींची एकमेव मागणी असल्याचे देखील आज की आवाजचे अध्यक्ष अजय कौल यांनी सांगितले.

आपल्या देशात 'प्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायदा' १९६०मध्ये संमत करण्यात आला. प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास, इजा पोहोचवण्याचा गुन्हा करणा-या व्यक्तीने "जर अपराध पहिल्यांदाच केला असेल तर दंड १० रुपयांपेक्षा कमी नसावा, मात्र तो ५० रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकतो. जर अपराध दुस-यांदा केला गेला असेल किंवा आधीचा अपराध केल्यानंतर तीन वर्षांच्या आत पुन्हा अपराध केला असेल तर दंड २५ रुपयांपेक्षा कमी नसावा, मात्र तो १०० रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकतो आणि तीन महिन्यांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, ही कायदेशीर तरतूद आहे" अशी माहिती प्राणीप्रेमी अजय कौल यांनी यावेळी दिली. बेझुबान, बुझो होप फॉर स्ट्रेज्, लायन्स क्लब ऑफ बाम्बे ओशिअनिक, मूव्हमेंट ऑफ सिटिझन्स अव्हेअरनेस, यारी रोड कलाविहार असोसिएशन, माहिती सेवा समिती आणि एकता मंच या संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही हातात घोषणाफलक घेऊन या निषेध आंदोलनात सहभाग घेतला.

Web Title: Tighten the law on animal cruelty; Hundreds of animal lovers protest for demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.