संग्रामने ‘रेसलिंग’मध्ये फडकावला तिरंगा
By Admin | Published: July 24, 2015 12:54 AM2015-07-24T00:54:25+5:302015-07-24T00:54:25+5:30
: नुकताच झालेल्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूपी कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियन स्पर्धेत ‘लास्ट मेन स्टँडींग’ करारावर सही करुन विजेतेपद पटकावणाऱ्या
मुंबई : नुकताच झालेल्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूपी कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियन स्पर्धेत ‘लास्ट मेन स्टँडींग’ करारावर सही करुन विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या संग्राम सिंगने हे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय रेसलरचा इतिहास रचला. या खेळाचा भारतात प्रसार होण्यासाठी प्रो रेसलिंग लीग स्पर्धेचे आयोजन करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे संग्रामने ‘लोकमत’ला सांगितले.
१८ जुलैला दक्षिण आफ्रिकेच्या नेल्सन मंडेला स्टेडियममध्ये झालेल्या थरारक लढतीत संग्रामने भारताचा तिरंगा फडकावताना कॅनडाच्या जो लिजंड याला लोळवले. दखल घेण्याची बाब म्हणजे या लढतीपुर्वी संग्रामला ‘लास्ट मेन स्टँडींग’ करावा लागाला. यानुसार या लढतीमध्ये कोणतीही दुखापत, फ्रॅक्चर झाले किंवा मृत्यु जरी ओढावला तर त्यास स्पर्धा आयोजक जबाबदार नसतील. त्यामुळे या जीवघेण्या लढतीसाठी संग्राम मोठ्या हिमतीने लढला आणि फक्त लढलाच नाही तर भारताचे नाव देखील विजेतेपदावर कोरले.
या थरारक लढतीबाबत संग्राम म्हणाला की, ‘निश्चितच यावेळी माझ्यावर दडपण होते. मात्र ज्यावेळी रिंगमध्ये गेल्यावर मी विजेत्याला दिला जाणाऱ्या ‘बेल्ट’वर आपला तिरंगा पाहिला तेव्हाच ठरवले की ही मॅच मी देशासाठी जिंकणारच. त्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला. लढतीआधी दोन्ही प्रतिस्पर्धीच्या देशांचे राष्ट्रगीत सादर करण्यात आले. यावेळी मी कॅनडाच्या राष्ट्रगीताला योग्य मान दिला मात्र माझ्या प्रतिस्पर्धीने भारताचे राष्ट्रगीत सादर होत असताना योग्य सम्मान न राखल्याने या लढतीत लिजंडला चांगलाच धडा शिकवण्याचा निर्धार केला.’
दरम्यान, संग्रामने यावेळी डब्ल्यूडब्ल्यूपी रेसलिंग खेळाच्या प्रसारासाठी भारतात देखील प्रो रेसलींग लीग स्पर्धा आयोजित करण्याची योजना आखली असून यासाठी तो सर्वप्रथम देशातील महत्त्वाच्या शहरांत स्वत: लाईव्ह लढती खेळेल जेणेकरुन भारतीयांना या खेळाची ओळख होईल. जागतिक स्तरावरील नावाजलेल्या मल्लांना संग्राम भारतात खेळण्यासाठी निमंत्रित करणार असून यामुळे नक्कीच हा खेळ भारतीयांना आवडेल असा विश्वासही संग्रामने यावेळी व्यक्त केला.