लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारी रोजी स्कॉर्पिओ कारमध्ये धमकीचे पत्र आणि जिलेटिनच्या कांड्या आढळल्या हाेत्या. याची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याची पोस्ट टेलिग्राम अॅपवर होती. याचे कनेक्शन दिल्लीतील तिहार कारागृह परिसरापर्यंत पोहोचले आहे.
स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याची पोस्ट तिहार कारागृह परिसरातून टेलिग्राम या ॲपवर पाठवल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.
अँटिलियापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर एका स्कॉर्पिओत २० जिलेटिनच्या कांड्या व धमकीचे पत्र २५ फेब्रुवारीला मिळाले होते. त्यानंतर २७ फेब्रुवारीला रात्री त्याची जबाबदारी जैश-उल-हिंद या संघटनेने स्वीकारल्याचा मेसेज टेलिग्राम ॲपवरून प्रसारित करण्यात आला होता. मात्र, ही माहिती खोटी असल्याचे त्या संघटनेने स्पष्ट केल्याचे मुंबई पोलिसांनी तेव्हा सांगितले होते. त्यानंतर तो मेसेज नेमका कोणत्या ठिकाणाहून पाठविण्यात आला, याचा शोध मुंबई पोलीस घेत होते. त्यासाठी एका खासगी सायबर कंपनीची मदत घेण्यात आली. त्यामध्ये त्या मोबाइल फोनचे लोकेशन दिल्लीच्या तिहार कारागृहाजवळ आढळून आले आहे.
तिहार जेलमध्ये अनेक अतिरेकी संघटनांचे सदस्य आहेत, त्यापैकी कोणीतरी एकाने हे कृत्य केल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे. दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची पूर्ण कल्पना देण्यात आली आहे. त्यांच्या मदतीने आणखी तपास केला जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.