TikTok वर तबरेजच्या हत्येबाबत वादग्रस्त व्हिडीओ, 5 जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 10:54 AM2019-07-09T10:54:44+5:302019-07-09T13:32:06+5:30
मुंबईतील पाच तरुणांनी टिक टॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. वादग्रस्त व्हिडीओ अपलोड केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - टिक टॉक या अॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. प्रसिद्धीसाठी अनेक जण विविध विषयांवरील आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करत असतात. असाच एक आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणं पाच तरुणांच्या अंगलट आले आहे. मुंबईतील पाच तरुणांनी टिक टॉकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. वादग्रस्त व्हिडीओ अपलोड केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झारखंडमधील तबरेज अन्सारीच्या हत्येचा या व्हिडीओमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. टीम 07 या नावाने त्यांनी व्हिडीओ अपलोड केला होता. कमी वेळात हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला. या तरुणांच्या फॉलोअर्सची संख्याही खूप जास्त आहे. 'तबरेजला तर तुम्ही मारुन टाकलं मात्र भविष्यात त्याच्या मुलाने याचा बदला घेतल्यास मुसलमान दहशतवादी असतो असं म्हणू नका' असा वादग्रस्त मजकूर या टिक टॉकच्या या व्हिडिओत आहे. याप्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
Mumbai Police cyber cell has registered an FIR against a group of people allegedly circulating a video on TikTok, related to mob lynching of Tabrez Ansari in Jharkhand. Matter is being investigated. TikTok has removed the video and suspended the accounts of the group of people. pic.twitter.com/YCs6xX8sJs
— ANI (@ANI) July 9, 2019
रमेश सोळंकी यांनी हा या पाच तरुणांचा वादग्रस्त व्हिडीओ पाहिल्यावर याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. रमेश सोळंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'माझ्या तक्रारीनंतर टिक टॉकने हा व्हिडिओ हटवला आहे. तसेच हा व्हिडिओ तयार करणाऱ्या तिघांचे अकाऊंटही सस्पेंड करण्यात आले आहेत. त्यामुळे या युजर्सना पुन्हा आपल्या अकाऊंटवरुन कोणतीही पोस्ट करता येणार नाही.' मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या पाच जणांविरोधात कलम 153 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तसेच टिक टॉककडून त्यांचं अकाऊंटही सस्पेंड करण्यात आले आहे.
Ramesh Solanki, complainant: I have been informed by TikTok that the video was removed from the platform and the 3 accounts were suspended after my complaint. Suspension in TikTok means that they can not log in into their accounts and can't post anything there. https://t.co/S8ClNcOtE8
— ANI (@ANI) July 9, 2019
तबरेज अन्सारी याला चोरी केल्याच्या संशयावरून जमावाने त्याला गेल्या 19 जून रोजी सेराईकेला-खारसावान जिल्ह्यात पकडून खांबाला बांधले व जबर मारहाण केली. 22 जून रोजी त्याचा मृत्यू झाला. अन्सारी याला ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ म्हणण्याची सक्तीही जमावाने केली गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसले. जमावाने केलेल्या मारहाणीत मरण पावलेल्या तबरेजच्या पत्नीला दिल्ली वक्फ मंडळ पाच लाख रुपये आणि नोकरी देणार आहे. ही माहिती वक्फ मंडळाचे अध्यक्ष आणि आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्लाह खान यांनी दिली होती.
अन्सारी याच्या पत्नीला कायद्याची मदत मिळण्यासाठीही वक्फ मंडळ मदत करील, असे अमानतुल्लाह खान म्हणाले. तबरेजच्या पत्नीला पाच लाख रुपयांचा धनादेश पाठविण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून, तो तिला देण्यासाठी मी बहुधा तेथे जाईन. वक्फ मंडळात आम्ही तिला नोकरीही देऊ आणि तिला विधिसाह्यही देऊ, असे खान यांनी सांगितले आहे. अन्सारीच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तबरेज अन्सारीच्या झारखंडमध्ये जमावाकडून झालेल्या हत्येने मला तीव्र वेदना झाल्या. दोषी लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. ते म्हणाले होते की, झारखंड, पश्चिम बंगाल किंवा केरळसह देशात कुठेही घडलेल्या हिंसाचाराच्या सगळ्या घटनांना एकाच मापात मोजले पाहिजे व त्यात कायद्याने त्याची भूमिका पार पाडली पाहिजे.
3 वर्षांपूर्वी गायब झाला होता पती, पत्नीने TikTok व्हिडीओ पाहिला आणि....
TikTok हे अॅप काही महिन्यांपूर्वी बॅन करण्यात आलं होतं. या अॅपमुळे तीन वर्षांपूर्वी गायब झालेला एका महिलेचा पती सापडला आहे. ही घटना आहे तामिळनाडूच्या विल्लुपुरम येथील. जयाप्रदा नावाच्या महिलेचा पती 3 वर्षापूर्वी त्यांना सोडून अचानक गायब झाला होता. पण टिकटॉकने त्याला शोधण्यास मदत झाली. न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, सुरेश नावाची व्यक्ती तीन वर्षापूर्वी 2016 मध्ये आपल्या दोन मुलांना आणि पत्नी जयाप्रदाला सोडून गेला होता. पत्नीने त्याच्या गायब होण्याची तक्रार पोलिसातही दिली होती. पोलिसांनी त्याचा शोधही घेतला, पण सुरेश काही मिळाला नव्हता. काही दिवसांपूर्वी जयाप्रदाला तिच्या नातेवाईकांनी एक व्हिडीओ दाखवला. या टिकटॉक व्हिडीओमध्ये एक व्यक्ती होती. जी सुरेशसारखी दिसत होती. खात्री करून घेण्यासाठी नातेवाईकांनी जयाप्रदाला व्हिडीओ दाखवला आणि तो व्हिडीओ बघून ती आनंदी झाली. कारण व्हिडीओतील व्यक्ती सुरेशच होता.
धक्कादायक! TikTok स्टार जिम ट्रेनरची गोळ्या घालून हत्या
टिक टॉकवर तब्बल 5 लाख फॉलोअर्स असलेल्या एका तरुणाची काही दिवसांपूर्वी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली होती. दिल्लीतील नजफगड परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. मोहित मोर असं या 27 वर्षीय स्टार जिम ट्रेनरचं नाव असून त्याची हत्या करण्यात आली. मोहित हा मूळचा हरयाणाचा असून नजफगडमध्ये तो एकटाच राहत होता. टिक टॉकमुळे तो काही दिवसातच सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला. मोहितचं कुटुंब हरयाणातील बहादूरगड येथे आहे. मोहितची जिम ही त्याच्यामुळेच लोकप्रिय झाली होती. सोशल मीडियावर त्याला असलेल्या प्रसिद्धीमुळे आजुबाजूच्या लोकांना त्याच्याबद्दल थोडा आकस होता. त्यातून वैर निर्माण झाल्याची माहिती मिळाली होती.