मुंबई: कोरोनाविरुद्धच्या लढाईत सेलिब्रिटींपासून सामान्य लोकांपर्यंत सर्वच जण आपापल्यापरीने मदतीचा हात पुढे करत आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड-19 (COVID- 19 ) या नव्या खात्याती निर्मिती करण्यात आली आहे. या खात्यात स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मुख्यमंत्र्याच्या या आवाहनानंतर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच आता कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी टिकटॉक आणि बाईट डान्सने देखील मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी टिकटॉक आणि बाईट डान्सने मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल 5 कोटींची मदत केली आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांसाठी एक लाख मास्कचा पुरवठा टिकटॉकडून करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र डीजीआयपीआर विभागाने दिली आहे. टिकटॉकच्या या मदतीनंतर उद्धव ठाकरे यांनी कपंनीचे आभार मानले आहेत.
टिकटॉक वापरकर्त्यांपर्यंत कंपनीने कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती ऑनलाईन पद्धतीने पोहोचवून जनजागृतीचे काम केले आहे. कोविड १९ युद्धात सहभागी होण्यासाठी टिकटॉक ॲपवर लाईव्ह डोनेशन जमा करण्याच्या व्यवस्थेसह या मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन कंपनीकडून करण्यात येत आहे.
जगभरात टिकटॉक वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 2019 मध्ये जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या अॅपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे अॅप टिकटॉक आहे. त्यामुळे टिकटॉकने केलेल्या या मदतीमुळे सर्वस्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.