नऊ लाख फॉलोअर्स असणारा ‘टिकटॉक स्टार’ गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:14 AM2021-01-08T04:14:42+5:302021-01-08T04:14:42+5:30
ओशिवरा पोलिसांची कारवाई : बुरख्यात केलेली चोरी बुटांमुळे उघड लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पकडले जाऊ नये म्हणून मॉडेलच्या ...
ओशिवरा पोलिसांची कारवाई : बुरख्यात केलेली चोरी बुटांमुळे उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पकडले जाऊ नये म्हणून मॉडेलच्या घरात बुरखा घालून चोरी करण्याची शक्कल चोराने लढवली. मात्र, त्याच्या बुटांनीच त्याला दगा दिला आणि अखेर त्याला गजाआड करण्यात ओशिवरा पोलिसांना बुधवारी यश मिळाले. अटक आरोपीचे नाव अभिमन्यू गुप्ता असून, तो लाखो फॉलोअर्स असणारा ‘टिकटॉक’ स्टार आहे.
गुप्ता हा अंधेरीत मॉडेल खुशबू अगरवाल हिच्या घरी राहत होता. इन्स्टाग्रामवर त्यांची मैत्री झाली होती. काही कामानिमित्त खुशबू १८ ते २२ डिसेंबर यादरम्यान बाहेर गेली होती. त्याचा फायदा घेत १९ डिसेंबर रोजी गुप्ताने तिच्या कपाटातील जवळपास पाच लाखांचा ऐवज लंपास केला. ती घरी परतली त्यानंतर २ जानेवारी रोजी हा प्रकार तिच्या लक्षात आला आणि तिने गुप्ताला याबाबत सांगितले. तेव्हा त्याने पोलीस तुझ्या मित्रांना त्रास देतील असे सांगत खुशबूला पोलिसांत तक्रार करण्यास अडवले. मात्र, तिने तक्रार दाखल केली. ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. बुरखा घातल्याने आपण पकडले जाणार नाही, या भ्रमात तो होता. मात्र त्याचे बुट पोलिसांना कॅमेऱ्यात दिसले, तसेच त्याचे एकंदर हावभाव देखील चोराशी मिळतेजुळते असल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या बाईकच्या सीटमधून चोरीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. जवळपास ९ लाख फॉलोअर्स असणाऱ्या गुप्ताला यापूर्वी जुहू पोलिसांनी २०१८ मध्ये एका जोडप्याच्या घरी साडेचार लाखांची घरफोडी केल्याप्रकरणी अटक केल्याचेही चौकशीत उघड झाले आहे.