Join us

टिळक पूल जीर्ण; लालबाग पुलाला गळती

By admin | Published: August 30, 2016 3:48 AM

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतरही महापालिकेने मुंबईतील दुरवस्था झालेल्या पुलांकडे दुर्लक्ष केले आहे.

सचिन लुंगसे / स्नेहा मोरे, मुंबईमहाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतरही महापालिकेने मुंबईतील दुरवस्था झालेल्या पुलांकडे दुर्लक्ष केले आहे. शहरासह उपनगरातील पुलांच्या डागडुजीसह पुनर्बांधणीबाबत महापालिकेने ठोस कार्यवाही अद्याप केलेली नाही. दादर येथील लोकमान्य टिळक पूल जीर्णावस्थेत आहे. या पुलाची दुरवस्था झाली आहे. गणेशोत्सवात हा पूल महत्त्वाचा दुवा आहे. या पुलावरून दररोज सव्वा ते दीड लाख वाहने ये-जा करतात. गिरणगावातील लालबाग पुलाला गेल्या काही महिन्यांपासून गळती लागली आहे. काही ठिकाणी पुलाचे सांधे निखळले आहेत. महापालिकेकडून मात्र याबाबत काहीच कार्यवाही करण्यात येत नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.१९२३ साली दादर येथील लोकमान्य टिळक पूल उभारण्यात आला. टिळक पूल हा दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. पुलावरून दररोज सुमारे सव्वा ते दीड लाख वाहने ये-जा करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंकडील फुटपाथ उखडले आहेत. पुलावर बसवण्यात आलेल्या बिडाच्या नक्षीदार जाळ्या चोरांनी लंपास केल्या आहेत. केवळ एक नक्षीदार जाळी शिल्लक आहे. पुलालगतच्या दगडी बांधकामांवर जाहिरातदारांनी जाहिरातींसाठीचे फलक लावता यावेत, म्हणून लोखंडी खांब उभे केले आहेत. लोखंडी खांब उभे करताना पुलाच्या दगडी बांधकामाला हानी पोहोचवण्यात आली आहे.गिरणगावातील लालबाग पुलाला गेल्या काही महिन्यांपासून गळती लागली आहे. शिवाय, काही ठिकाणी पुलाचे सांधे निखळल्याने गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला असताना गणेशभक्तांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्वरित या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आगमन सोहळ्यांदरम्यान देखील लालबाग पुलाच्या या दुरवस्थेचा फटका बसला. तसेच या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात घरगुती गणपतीही येथूनच मार्गक्रमण करतात. गणेशोत्सवादरम्यान लालबाग, परळ, काळाचौकी या विभागांत गणेशदर्शनाचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. तसेच बऱ्याच परदेशी नागरिकांचाही यात समावेश असतो. अशा परिस्थितीत अगोदरच रस्त्यांवरील खड्ड्यांच्या होणाऱ्या त्रासात भर पडून या पुलाच्या गळतीमुळे गणेशभक्तांची अधिक गैरसोय होईल.लोखंडी खांब उभे करताना चार ते पाच फूट खणण्यात आले आहे. त्यामुळे धोका अधिकच वाढला आहे. शिवाय पुलाचे दगड काही ठिकाणी निखळले आहेत. यावर तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. तर काही दगड चोरांनी लंपास केले आहेत. पुलाच्या पूर्वेसह पश्चिमेकडील दगडी बांधकामांवर वृक्ष वाढले आहेत. वृक्षांची उंची दहा फुटांहून अधिक आहे. वृक्षांची मुळे दगडी बांधकामांवर पसरली आहेत. त्यामुळे दगडी पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलावरील लोखंडी साहित्याला गंज लागला आहे. फेरीवाल्यांकडूनही पुलाला धोका पोहोचवला जात आहे.मुख्यमंत्र्यांकडेही मुद्दा मांडून उपयोग शून्यगणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी दादर चौपाटीवर जाण्याकरिता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मुख्यत्वे टिळक पुलाचा वापर केला जातो. दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यात हा पूल मोलाची भूमिका बजावतो. दररोज या पुलावरून सुमारे सव्वा ते दीड लाख वाहने ये-जा करतात. टिळक पुलाच्या दुरुस्तीसह पुनर्बांधणीसाठी सातत्याने आवाज उठवण्यात आला आहे. महापालिकेसोबत झालेल्या बैठकीत कित्येक वेळा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही हा मुद्दा मांडला आहे. मात्र अद्यापही महापालिकेने याकडे लक्ष दिलेले नाही.- कुंदन आगासकर, कार्याध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीमुंबईतील ३४ पूल होते धोकादायककोकणातील महाड येथील भीषण दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परंतु मुंबईतील एकही पूल धोकादायक नसल्याचा दावा महापालिकेने यापूर्वीच केला आहे. मुंबईमधील पुलांच्या स्थैर्याची मात्र चाचपणी करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतील ३४ पूल धोकादायक ठरविले होते. या पुलांच्या दुरुस्तीसाठी सल्लागार नेमण्यात येणार होता. मात्र २०१४ सालापासून कारवाई झाली नाही.वारंवार पत्रव्यवहारानंतरही दुर्लक्षदेखभाल व दुरुस्ती पाहणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा आजपर्यंत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. हा पावसाळा सुरू झाल्यापासून या पाण्याच्या धबधब्याचा त्रास येथील नागरिक सहन करीत असून काही वेळा अपघातसुद्धा झालेले आहेत. महानगरपालिकेने याबाबत लवकर दुरुस्ती नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालबाग पुलावरील फुटलेल्या पाइपांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन महानगरपालिकेसमोर आयोजित करेल.- विजय देशमुख, उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनापुलांची दुरुस्ती गरजेचीमुंबईत नवीन पूल व भुयारी मार्ग बांधण्यासाठी महापालिकेच्या हालचाली सुरू आहेत. मात्र जुन्या पुलांची दुरुस्ती व तपासणीसाठी कार्यवाही करण्यात येत नाही. मुंबईत ३१४ पूल आहेत़ यापैकी काही पूल ब्रिटिशकालीन आहेत. त्यामुळे त्यांची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे.महापालिकेचे पूलनाले नद्यांवरील पूल ४३रेल्वेवरील पूल ४१उड्डाणपूल १६पादचारी पूल ४९रेल्वेवरील पादचारी पूल ३६वाहनांचे भुयारी मार्ग १०पादचारी भुयारी मार्ग १९विभागानुसार विभागणीशहरातील पूल ८१पश्चिम उपनगर पूल १४३पूर्व उपनगरांतील पूल ९०