टिळक टर्मिनसची जीवघेणी वाट
By admin | Published: September 14, 2016 04:54 AM2016-09-14T04:54:37+5:302016-09-14T04:54:37+5:30
लोकमान्य टिळक टर्मिनसवर जाण्यासाठी कुर्ला रेल्वे स्थानकातच अनेक जण उतरून पायी टर्मिनस गाठतात. मात्र या मार्गालगत प्रवाशांना जीव मुठीत धरून रूळ ओलांडून जावे लागत आहे
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसवर जाण्यासाठी कुर्ला रेल्वे स्थानकातच अनेक जण उतरून पायी टर्मिनस गाठतात. मात्र या मार्गालगत प्रवाशांना जीव मुठीत धरून रूळ ओलांडून जावे लागत आहे. रेल्वेने या ठिकाणी स्कायवॉकचे काम सुरू केले आहे. मात्र अनेक दिवसांपासून स्कायवॉकचे काम बंद असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.
मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे टर्मिनसमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसचा समावेश आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या अनेक ट्रेन्स या टर्मिनसवरून सुटतात. त्यामुळे टर्मिनसवर नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या कुर्ला रेल्वे स्थानकातून लोकमान्य टिळक टर्मिनस अगदी दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे अनेक प्रवासी कुर्ला रेल्वे स्थानकातूनच लोकमान्य टिळक टर्मिनस गाठतात. ज्या प्रवाशांना पायी वाट माहीत नाही असे प्रवासी कुर्ला पूर्वेकडून शेअर रिक्षाने जातात. मात्र गेल्या काही वर्षांत कुर्ल्यातील रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी लूट पाहता अनेक प्रवासी हे रिक्षाने न जाता पायीच जाणे उचित समजतात. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या अपघातांमुळे रेल्वेने कुर्ला ते लोकमान्य टर्मिनस असा स्कायवॉक बनवण्याचा प्रस्ताव आखला आहे. त्यानुसार कामदेखील सुरू करण्यात आले आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे काम रखडल्याने रेल्वेने तत्काळ हे काम पूर्ण करावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
कुर्ला रेल्वे स्थानकातून काही मिनिटांतच लोकमान्य टर्मिनसवर पोहोचता येते. मात्र या ठिकाणी प्रवाशांना हार्बर रेल्वेचे रूळ ओलांडून जावे लागत
असल्याने आजवर या ठिकाणी अनेकांचे अपघातदेखील झाले आहेत.
या क्रॉसिंगजवळ वळण असल्याने अनेकदा रुळातून जाणाऱ्यांना समोरून येणारी गाडी पटकन दिसत नाही. त्यामुळे अपघातांची संख्याही वाढते आहे. मात्र दुसरा पर्याय नसल्याने प्रवासी जीव मुठीत धरून रेल्वे रूळ पार करावे लागतात.