धूम स्टाईलने चोरी करणाऱ्याकडून मोबाईल विकत घेणाऱ्याला बेड्या
By मनीषा म्हात्रे | Published: September 2, 2022 09:12 PM2022-09-02T21:12:25+5:302022-09-02T21:12:36+5:30
चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्या आरोपीला टिळकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई : चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्या आरोपीला टिळकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जमीर हसन समीर सय्यद (२२) असे या आरोपीचे नाव असून तो गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये राहण्यास आहे. तसेच त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर पश्चिमेकडील टिळकनगर काॅलनीमध्ये राहाणाऱ्या नम्रता झुंगे (३०) या २५ आॅगस्टच्या दुपारी सव्वाबाराच्या सुमारास येथील युनिर्व्हसल स्कूल समोरुन मोबाईलवर बोलत जात होत्या. मागावर आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या हातातील २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. नम्रता यांच्या तक्रारीवरुन टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास
सुरु आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेत आरोपीने गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा नंबर मिळवला. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी सय्यद याला ताब्यात घेत केलेल्या चाैकशीत त्याने हा मोबाईल फारुख याच्याकडून विकत घेतल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलीस तपासात सय्यद हा चोरीचे मोबाईल विकत घेत असल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक करुन त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना चोरीचे २६ मोबाईल सापडले.
पोलिसांनी सय्यद याच्याकडून नम्रता यांच्या चोरी झालेल्या मोबाईलसह ०३ लाख ९७ हजार रुपये किंमतीचे २६ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेली ६५ हजार रुपये किंमतीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. अशाप्रकारे पोलिसांनी आतापर्यत ०४ लाख ८२ हजार रुपयांचा एेवज जप्त करत फारुख याचा शोध सुरु केला आहे.