मस्तच! मुंबईतील कचऱ्यातून आता तयार हाेणार टाइल्स आणि पेव्हर ब्लॉक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 10:29 AM2023-12-13T10:29:14+5:302023-12-13T10:29:53+5:30
बायोगॅस निर्मितीसह कचरा हस्तांतरण केंद्राचा लवकरच कायापालट होणार.
मुंबई : गोराई आणि महालक्ष्मी येथील कचरा हस्तांतरण केंद्राचा लवकरच कायापालट होणार आहे. या केंद्रावर सुका आणि ओल्या कचऱ्याचे विलगीकरण करून प्रक्रियेद्वारे टाइल्स, विटा आणि पेव्हर ब्लॉक्स बनवण्यात येतील.
महालक्ष्मी येथील केंद्रावर दररोज ६२५ मेट्रिक टन, तर गोराई केंद्रावर ३५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. महानगरपालिकेने २०१७ सालापासून गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले होते. २० हजार चौरस मीटर
आणि त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळात वसलेल्या तसेच १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्यांना कचरा व्यवस्थापन बंधनकारक होते. परंतु कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोसायट्यांना बंधनकारक करता येणार नाही, असा निर्णय मध्यंतरी न्यायालयाने दिला. त्यामुळे कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी पालिकेला अन्य उपाय हाती घ्यावे लागले आहेत.
आराखडा तयार करण्यासाठी महानगरपालिकेने निविदा मागवल्या आहेत. महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे डम्पिंग ग्राउंडवर जाणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात माेठ्या प्रमाणात घट होईल, अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे.
सुका आणि ओल्या कचऱ्याचे विलगीकरण केल्यानंतर प्रक्रिया करून विविध वस्तूंसह बायाेगॅस निर्मितीदेखील केली जाणार असून त्यासाठी पालिकेकडून गोराई आणि महालक्ष्मी येथील केंद्रांवर सुविधा करण्यात येणार आहे.
मुंबईत दररोज सहा हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो. त्यापैकी दोन हजार मेट्रिक टन कचरा या केंद्रांवरून जमा केला जातो. त्यानंतर तो डम्पिंग ग्राउंडवर नेला जातो. केंद्रावर जमा होणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. केंद्राचा कायापालट झाल्यानंतर दुर्गंधी कमी होईल.