Join us  

...तोपर्यंत दाभोलकरांच्या पाऊलखुणा राहतील - नसीरुद्दीन शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 11:37 AM

नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई : जगात थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तोपर्यंत डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पाऊलखुणा कायम राहतील. त्या मिटणार नाहीत. उलटपक्षी अधिक ठळक होतील. त्यांच्या काळात जन्म लाभला याचा मला अभिमान आहे. दाभोलकरांप्रमाणेच पानसरेसाहेब, कलबुर्गीसाहेब आणि गौरी लंकेश यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी कायम खरे बोलण्याचा गुन्हा केला, असे मत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्घाटन झाले. त्यावेळी नसीरुद्दीन बोलत होते. चित्र प्रदर्शन १ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 

नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रातील ऋणानुबंध हॉलमध्ये ‘वुई आर ऑन ट्रायल - कसोटी विवेकाची’ हे डॉ. दाभोलकरांचे विचार अधोरेखित करणारे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. ‘फ्रेंड्स फॉर दाभोलकर’ यांच्यातर्फे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या ३० विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे व शिल्पे मांडण्यात आली आहेत. उद्घाटनप्रसंगी दाभोलकरांच्या पत्नी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शैला दाभोलकर, ॲड. अभय नेवगी, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, आदी मान्यवर उपस्थित होते. तिघांनाही दाभोलकरांची पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. 

नसीरुद्दीन शहा पुढे म्हणाले, ‘अंधविश्वासाचे साम्राज्य केवळ आपल्याच देशात नाही. अंधश्रद्धेविरुद्ध लढणाऱ्या सलमान तहसीरसाहेब, सबीना मेहमूद यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे शेजारील राष्ट्रांवर नजर टाकल्यास लक्षात येईल. इराणमध्ये हजारो मुली हिजाबाविरोधात आंदोलन करत आहेत. अशा आदर्शवाद्यांच्या युगात जन्म घेण्याचे सौभाग्य मला लाभले. दाभोलकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कामाबाबत माहीत झाले.’

नरेंद्र यांच्यासोबत ४५ वर्षे संसार केल्यानंतर आता नरेंद्र नाहीत असे कधीच वाटत नसल्याचे सांगत डॉ. शैला म्हणाल्या की, लढणे म्हणजे जिंकणे हा दाभोलकरांचा विचार आत्मसात केला आहे. व्यसनमुक्तीच्या कामात वाहून घेतले आहे. दाभोलकरांना सव्वाशे वर्षे जगायचे होते. कायम फिट राहिल्याने ते कधीच आजारी पडले नसल्याचे सांगताना ‘जमेल तेवढी कृती करा,’ हा मंत्र त्यांनी आजच्या पिढीला दिला. नेवगी यांनी दाभोलकरांच्या ट्रायलबाबत सांगितले. 

चित्र प्रदर्शनात काय? चित्र प्रदर्शनात जात पंचायत मूठमाती अभियान, शोध भुताचा, विद्यार्थी जाणीवजागृती, सत्यशोधन आव्हान यात्रा व बुवांचे भांडाफोड, विज्ञान निर्भयता निधी, संविधान बांधिलकी महोत्सव, अंधश्रद्धा निर्मूलन कृत्रिम वृक्ष, अंत्ययात्रा तिरडी, जन्मपत्रिका, गंडे-दोरे-तावीज-काळ्या बाहुल्या, अंधश्रद्धा जटा कापणे, माझा जोडीदार माझा निकष, स्त्री-पुरुष समानता, कॅलिडोस्कोप यांवर आधारित चित्रे व शिल्पे पाहायला मिळणार आहेत.

टॅग्स :नसिरुद्दीन शाहनरेंद्र दाभोलकर