Join us

‘ते’ काम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात आजपर्यंत एकही गुन्हा दाखल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 09:24 IST

कंत्राटदाराविरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या चाळीस वर्षांपासून शाळेच्या प्रांगणात उभी असलेली हिरवीगार झाडांची खासगी जाहिरातीच्या होर्डिंग्जसाठी कत्तल केल्याची घटना वांद्रे येथील कार्डिनल चर्चमध्ये घडली. झाडे कापण्यास आणि होर्डिंग्जला परवानगी नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र, कंत्राटदाराविरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

वांद्रे (पूर्व) सिद्धार्थ कॉलनी येथील भुयारी मार्गासमोर जुने कार्डिनल चर्च आहे. चर्चच्या परिसरात अनेक हिरवीगार झाडे आहेत. चर्च पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ असल्याने चर्चच्या वास्तूवर थेट लक्ष जाते. त्यामुळे येथील मोक्याच्या जागेत खासगी जाहिरात होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. या होर्डिंग्जआड येणाऱ्या झाडांची कत्तल केली. तसेच शिल्लक झाडांच्या फांद्या कापून झाडे विद्रुप करण्यात आली आहेत. त्यामुळे सहज नजरेस पडणारी कापलेली झाडे पाहून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

परवानगीशिवाय झाडे कापली 

याबाबत एच पूर्व महापालिका सहायक उद्यान निरीक्षक यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंत्राटदाराने पालिकेच्या परवानगीशिवाय झाडे कापली आहेत. तशा नागरिकांकडून त्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याची खेरवाडी पोलिसांनी दखल घेतली आहे. मात्र, अजून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

‘ते’ होर्डिंग्ज अनधिकृत 

झाडे कापताना नागरिकांनी विचारणा केली होती. मात्र, कंत्रादाराने लोकांना दाद दिली नाही. तेव्हा पोलिसांनी त्याची दखल घेतली. झाडे कापण्यासाठी कंत्राटदाराने बाहेरून माणसे आणली होती. हे होर्डिंग अनधिकृत असल्याचे येथील रहिवासी विश्वास जाधव यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका