Join us

निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्यासाठी प्रयत्नशील, विद्यापीठाची उच्च न्यायालयाला माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:47 AM

पदवी अभ्यासक्रमाचे सर्व निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.

मुंबई : पदवी अभ्यासक्रमाचे सर्व निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.प्राध्यापक चोवीस तास उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करत आहेत, असे विद्यापीठाचे वकील रुई रोड्रीग्स यांनी न्या. अनुप मोहता व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाला सांगितले.‘बी.ए, बी.कॉम व बी.एसस्सीचा निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्यासाठी विद्यापीठ सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका नसल्याने परदेशातील विद्यापीठांत प्रवेश घेण्यास अडचण झाली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने मदत कक्ष उभारला आहे. पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तातडीने तपासण्यात येत आहेत व त्यांना छापील गुणपत्रिका देण्याची सोय केली आहे,’ असे रोड्रीग्स यांनी न्यायालयाला सांगितले.‘अनेक केसेसमध्ये विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका थेट त्यांच्या महाविद्यालयांना किंवा ज्या विद्यापीठात ते प्रवेश घेऊ इच्छितात, अशा विद्यापीठांना पाठवल्या आहेत,’ अशी माहिती रोड्रीग्स यांनी दिली.विद्यापीठाने निकाल लावण्याची दिलेली नवीन मुदत पाळली पाहिजे, असे न्यायालयाने सांगितले.दरम्यान निकाल गोंधळामुळे विद्यार्थी व पालक तणावाखाली असून निदान ३१ आॅगस्टला तरी निकाल लागावेत, अशी मागणी त्यांच्यासह विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे.काय चुकले,हे सांगावे लागेल‘३१ आॅगस्टला तुम्ही (विद्यापीठ) केवळ निकाल लावण्यास बांधील नाही तर तुमचे कुठे चुकले, हेही सांगण्यास बांधील आहात. विलंब का झाला? आणि भविष्यात असे घडणार नाही, याची काळजी कशी घ्याल? हेही तुम्हाला सांगावे लागेल,’ असे न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ