गिरणी कामगारांना विकल्प अर्ज सादर करण्यासाठी ३० जुलैपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 05:34 AM2018-07-08T05:34:02+5:302018-07-08T05:34:56+5:30

म्हाडातर्फे एमएमआरडीएच्या अखत्यारीतील पनवेल येथील मौजे कोन येथे बांधलेल्या २,४१७ घरांच्या काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार, वारस यांना लॉटरीत मिळालेले घर नको असल्यास, त्यांना त्यांच्या गिरण्यांच्या जागेवर होत असलेल्या अथवा होणार असलेल्या घरांच्या सोडतीमध्ये भाग घेण्याचा विकल्प उपलब्ध करून देण्यात आला आहे.

till July 30 for submission of alternative applications to Mill workers | गिरणी कामगारांना विकल्प अर्ज सादर करण्यासाठी ३० जुलैपर्यंत मुदत

गिरणी कामगारांना विकल्प अर्ज सादर करण्यासाठी ३० जुलैपर्यंत मुदत

Next

मुंबई : म्हाडातर्फे एमएमआरडीएच्या अखत्यारीतील पनवेल येथील मौजे कोन येथे बांधलेल्या २,४१७ घरांच्या काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार, वारस यांना लॉटरीत मिळालेले घर नको असल्यास, त्यांना त्यांच्या गिरण्यांच्या जागेवर होत असलेल्या अथवा होणार असलेल्या घरांच्या सोडतीमध्ये भाग घेण्याचा विकल्प उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार, ३० जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
२ डिसेंबर २०१६ला झालेल्या सोडतीनंतर काही गिरणी कामगार संघटनांनी शासनाकडे केलेल्या मागणीनुसार, उच्चस्तरीय समितीने दिलेल्या निर्देशानुसार हा विकल्प देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यशस्वी गिरणी कामगारांनी किंवा त्यांच्या वारसांनी म्हाडाने तयार केलेल्या नमुन्यात विकल्प अर्ज सादर करावयाचा आहे.
म्हाडातर्फे देण्यात आलेल्या विकल्प अर्ज क्रमांक १ नुसार २ डिसेंबर २०१६च्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले गिरणी कामगार किंवा त्यांचे वारस ज्यांना मौजे कोन येथील घरे घ्यायची आहेत़
त्यांची पात्रता निश्चिती करून, घर वितरणाची कार्यवाही केली जाणार आहे. विकल्प अर्ज क्रमांक २ नुसार २ डिसेंबर २०१६ च्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले गिरणी कामगार किंवा वारस मूळ गिरणी कामगार ज्या गिरणीमध्ये कामाला होते, त्याच गिरणीच्या जमिनीवर बांधलेल्या सदनिकांसाठी भविष्यात जेव्हा कधी सोडत काढण्यात येईल, त्या सोडतीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करण्यात येईल.
विकल्प अर्ज क्रमांक २ भरून दिल्यास मौजे कोन येथील आता मिळणाऱ्या घरावर त्यांचा कोणताही हक्क राहणार नाही किंवा त्याबाबत गिरणी कामगार किंवा त्यांचे वारस कोणताही दावा करू शकणार नाहीत, तसेच त्यांना लॉटरीत लागलेल्या घराला प्रतीक्षा यादीवरील पुढील अर्जदारास संधी देण्यास त्यांची काहीही हरकत राहणार नाही.
यशस्वी गिरणी कामगार आणि वारस यांनी कोणताही विकल्प न दिल्यास किंवा दोन्ही विकल्प दिल्यास मौजे कोन येथे लॉटरीत लागलेले घर पसंत आहे, असे समजण्यात येईल. मयत गिरणी कामगाराच्या बाबतीत एकापेक्षा अधिक वारसांनी अर्ज करून दोन वेगवेगळे विकल्प दिल्यास, जो अर्ज प्रथम प्राप्त होईल, त्याचा विचार करण्यात येईल. दोन वेगवेगळे अर्ज भरून वेगवेगळे विकल्प दिल्यास, जो अर्ज प्रथम प्राप्त होईल, त्याचा विचार करण्यात येईल. विकल्प अर्ज दिलेल्या वेळेत प्राप्त न झाल्यास, मौजे कोन येथील घरासाठी यशस्वी गिरणी कामगार आणि वारस यांचा विचार करण्यात येईल.
म्हाडाला मॉडर्न मिल, कमला मिल, खटाव मिल, फिनिक्स मिल, कोहिनूर मिल नंबर १ (एनटीसी), कोहिनूर मिल नंबर -२ (एनटीसी), पोद्दार मिल (एनटीसी), मफतलाल मिल नंबर-१, मफतलाल मिल नंबर-२, मुकेश टेक्सटाइल मिल या गिरण्यांची जमीन म्हाडाला मिळणार नाही, याची नोंद यशस्वी गिरणी कामगार आणि वारस यांनी घेण्याचे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.
सदर विकल्प अर्ज म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर, तसेच वांद्रेतील म्हाडाच्या मुख्यालयात ३० जुलैपर्यंत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत.


सोडतीमधील यशस्वी अर्जदारांनी शासनाच्या निर्दशानुसार दोन विकल्पांच्या नमुन्यांपैकी स्वेच्छेनुसार कोणताही एक विकल्प समक्ष हजर राहून व ओळख पटवून सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज जमा केल्याची छापील पोच पावती घ्यावी, असे आवाहनही म्हाडातर्फे करण्यात येत आहे. यशस्वी गिरणी कामगार आणि वारस यांना फोनवरून मेसेज करून, तसेच पोस्टाने पत्र पाठवून विकल्प अर्ज सादर करण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे.

Web Title: till July 30 for submission of alternative applications to Mill workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.