Join us

आतापर्यंत ST चे २७ हजार कर्मचारी कामावर रुजू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 10:11 AM

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला तीन महिने पूर्ण

ठळक मुद्देएसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार २८ जानेवारीपर्यंत संपकरी कर्मचाऱ्यांपैकी २७,१९२ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. या तीन महिन्यांमध्ये विविध घडामोडी घडूनही अद्यापही संपावर कोणताच तोडगा निघाला नाही. संप सुरू झाल्यापासून आतापर्यंत २७,१९२ संपकरी एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले. या कर्मचाऱ्यांसह खासगी चालकांच्या मदतीने एकूण ८ हजारहून अधिक फेऱ्या मार्गस्थ करण्यात आल्या आहेत. तसेच २५० पैकी २४४ आगार अंशतः चालू झाल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे.

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार २८ जानेवारीपर्यंत संपकरी कर्मचाऱ्यांपैकी २७,१९२ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. एकूण ६,४२६ कर्मचारी बडतर्फ झाले असून ११,०२४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. तर ७८७६ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २५ ऑक्टोबर २०२१ ला परिवहनमंत्री अनिल परब यांनी अधिकारी, कर्मचारी वर्गासाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ केली. तर दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये, तर कर्मचाऱ्यांना २५०० रुपये देण्याची घोषणा केली हाेती. दरम्यान,  संपकाळात सरकारच्या दडपशाहीमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या ८० आत्महत्या झाल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :एसटी संपमुंबईअनिल परब