मुंबई : कोविड प्रतिबंधक लस आतापर्यंत ६७ लाख नागरिकांना घेतली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसारही मुंबईत आता नियंत्रणात आला आहे. तरीही सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे अनिवार्य करण्यात आल्यानंतरही काही नागरिक मास्क लावत नसल्याचे दिसून येत आहे. अशा ४,१७४ नागरिकांकडून पालिका आणि पोलिसांनी आठ लाख ३४ हजारांचा दंड एका दिवसात वसूल केला आहे. तर आतापर्यंत ३० लाख ४४ हजार नागरिकांकडून ६१ कोटी २८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा मुंबईत शिरकाव झाल्यानंतर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यास एप्रिल २०२०पासून पालिकेने सुरुवात केली. तर रेल्वे स्थानक तसेच अन्य परिसरातही कारवाईसाठी पोलिसांची मदत घेण्यात आली. प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येत असल्याने नागरिक आठवणीने मास्क लावू लागले.
मात्र, दंडाची रक्कम अधिक असल्याने कालांतराने त्यामध्ये घट करत प्रत्येकी दोनशे रुपये वसूल केले जाऊ लागले. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. दिवसभरात अशा ४,१७४ नागरिकांना पकडून त्यांच्याकडून आठ लाख ३४ हजार आठशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
एप्रिल २०२० ते २६ जुलै २०२१
(नागरिक).... आतापर्यंत दंड
२६०८३८८...५२५३१९८०० (महापालिकेमार्फत कारवाई)
४१२५१५....८२५०३००० (मुंबई पोलिसांमार्फत कारवाई)
अंधेरी पश्चिम विभागात सर्वाधिक कारवाई
एप्रिल २०२० ते २६ जुलै २०२१पर्यंत ३० लाख ४४ हजार ७९४ लोकांवर कारवाई करून ६१ कोटी २८ लाख ६२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. अंधेरी पश्चिम विभागात सर्वाधिक ३९२ विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून ७८ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. अंधेरी पश्चिम, गोरेगाव, मालाड या परिसरातून सर्वाधिक ८३३ नागरिकांना विनामास्क पकडण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख ६६ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.