निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्याचे मुंबई विद्यापीठाचे प्रयत्न, उत्तरपत्रिका तपासणी चोवीस तास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:28 AM2017-08-26T01:28:19+5:302017-08-26T01:28:22+5:30
पदवी अभ्यासक्रमाचे सर्व निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने गुरुवारी उच्च न्यायालयाला दिली. प्राध्यापक चोवीस तास उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करत आहेत
मुंबई : पदवी अभ्यासक्रमाचे सर्व निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने गुरुवारी उच्च न्यायालयाला दिली. प्राध्यापक चोवीस तास उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करत आहेत, असे विद्यापीठाचे वकील रुई रॉड्रीग्स यांनी न्या. अनुप मोहता व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाला सांगितले.
‘बीए, बीकॉम व बीएस्सीचा निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्यासाठी विद्यापीठ सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका नसल्याने परदेशातील विद्यापीठांत प्रवेश घेण्यास अडचण झाली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने मदत कक्ष उभारला आहे. पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तातडीने तपासण्यात येत आहेत व त्यांना छापील गुणपत्रिका देण्याची सोय केली आहे. काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका थेट ते प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या महाविद्यालयांना किंवा विद्यापीठालाही पाठवल्या आहेत,’ असेही रोड्रीग्स यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर विद्यापीठाने दिलेली नवीन मुदत पाळली पाहिजे, असे न्यायालयाने बजावले.