Join us

"आजपर्यंत शरद पवार कर्मचाऱ्यांच्या बाजूनं लढाईत उतरलेत..."; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 5:25 PM

आज शेकडोच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन केलं.

मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन(ST Workers Strike) संपले असे वाटत असताना आज पुन्हा एकदा एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले. शेकडोच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन केलं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेल करण्यात आली. यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"न्यायालयानं यासंदर्भात निर्णय दिला. त्याचं स्वागत केलं, पेढे वाढले आणि काही जण हे आंदोलन पेटत राहावं यासाठी प्रयत्न करत होते. आजपर्यंत शरद पवार हे कर्मचाऱ्यांच्या बाजूनं लढाईत उतरलेत. आजपर्यंत कोणतंही आंदोलन सत्ताधारी पक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या नेत्याच्या घरापर्यंत गेलं नाही. या सरकारनं जेवढे एसटी कर्मचाऱ्या बाजूनं निर्णय घेतले तितके कोणी घेतले नाहीत. यानंतरही आंदोलकांनी घरापर्यंत जावं, दगड फेकून, चपला फेकून मार्ग निघणार नाही. उद्या कोणीही कोणाच्या घरावर जाईल आणि आमच्या मागण्या मान्य करा, दगड फेकू चपला फेकू असं होईल, हे दुर्देवी आहे," असं मुंडे म्हणाले."शरद पवारांनी अनेक वर्ष कर्मचाऱ्यांच्या बाजूनं हयात घातली. त्यांच्याच घरावर हे आंदोलन झालं. यात कुठेतरी संशयही निर्माण होतोय हे समोर येणं गरजेचं आहे. हे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आहे असं वाटलं" असंही ते म्हणाले. ज्या मागण्या रास्तपणे मान्य करता येणार होत्या केल्या. पवारांच्या मध्यस्थीनं हे मिळालं. न्यायालयाचा निकालही कर्मचाऱ्यांच्या बाजूनं लागला, तेव्हा कुठे काही जणांनी याचा राग, षडयंत्र हे पोलिसांनी तपासलं पाहिजे असल्याचंही त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :शरद पवारधनंजय मुंडेएसटी संप